• Download App
    तरुण नेतृत्वाची उपेक्षाच कमलनाथांना भोवली | The Focus India

    तरुण नेतृत्वाची उपेक्षाच कमलनाथांना भोवली

    विशेष प्रतिनिधी

    राजकीयदृष्ट्या प्रतिकूल काळात तरुण नेतृत्वाने मेहनत घ्यायची. राज्यात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तयार करण्यासाठी जीवापाड मेहनत घ्यायची. राज्यभर फिरून वातावरण निर्मिती करायची आणि सत्ता आली की त्याच नेतृत्वाला खड्यासारखे उचलून बाजूला फेकायचे. जुने वैर उकरून काढून सत्तेमधला सन्मानाचा वाटाही त्या नेतृत्वाला मिळू द्यायचा नाही. परिणाम म्हणून त्या तरुण नेत्याने बंड करायचे आणि आपल्याच पक्षाची सत्ता उलथवून लावायची. नेमके हेच मध्य प्रदेशात घडले आहे. पन्नाशीच्या तरुण नेतृत्वाकडे मुख्यमंत्रीपद सोपवायचे की दंगलीचा डाग असणाऱ्या राजकीय कारकीर्द अखेरच्या टप्प्यात असलेल्या नेत्याकडे ते सोपवायचे याचा राजकीय विवेक काँग्रेस हायकमांडने बाळगला नसल्याचा तो परिणाम आहे.

    काँग्रेसला सत्तेवर आणण्यासाठी प्रचंड मेहनत ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली. मुख्यमंत्रिपदावर त्यांचा खरा दावा होता. काँग्रेस हायकमांडने तो नाकारला. तो नाकारतानाही ज्योतिरादित्य शिंदे यांना एवढे अपमानित करण्यात आले की त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत कोणते स्थान हे देखील ठेवण्यात आले नाही. उलट ज्यांचे राजकीय कर्तृत्व दिल्लीतील शीख विरोधी दंगलीने डागाळले आहे, त्या कमलनाथांकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले. त्यांनी तर ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशाच्या राजकारणातून कायमचे उखडायचा चंगच बांधला. गेल्या १५ महिन्यांमध्ये अशा कारवाया करून ज्योतिरादित्य आणि त्यांच्या समर्थकांना राजकीय कडेलोटावर आणून ठेवले. पण आज बाजी पूर्ण पलटून कमलनाथ यांचाच राजकीय कडेलोट झाला. विधानसभेत शक्तिपरीक्षेपूर्वीच त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्योतिरादित्य यांना सत्तेमध्य़े सन्मानाचा वाटा दिला असता, तर कमलनाथ यांच्यावर राजीनाम्याची वेळ आली नसती. मिशन कमळ यशस्वी झाले, हा युक्तिवाद कितीही आकर्षक असला तरी तो अर्धवट आहे. मिशन कमळ आहेच, पण ते यशस्वी करण्यात कमळवाल्या पक्षापेक्षा काँग्रेस हायकमांडनेच आणि खुद्द कमलनाथ यांनीच आपल्या राजकीय कर्तृत्वाने हातभार लावला आहे, ही राजकीय वस्तुस्थिती आहे. काँग्रेसची राजकीय मार्केट व्हॅल्यू संपल्याची ती निदर्शक आहे.

    यात नुकसान काँग्रेस हायकमांडचे झाले नाही. काँग्रेस पक्षाचे झाले आहे. वैयक्तिक कमलनाथ यांच्या राजकीय कारकिर्दीचे झाले आहे. हे नुकसान कमलनाथ टाळू शकले असते. पण हायकमांडच्या आशीर्वादाने आणि विशिष्ट राजकीय हेतूने त्यांनाच ते टाळायचे नव्हते. मध्य प्रदेशातला आठवभराचा घटनाक्रम हेच सांगतो.

    Related posts

    Happy birthday Smriti Irani: वो शक्ती है, सशक्त है वो भारत की नारी है..! राहुल गांधींचा गड जिंकणाऱ्या स्मृती इराणी यांना खास शुभेच्छा ; ‘ तुलसी ते अमेठी ‘@46

    Shivsena Unrest : असंतोषावर ठाकरेंचा “उतारा”; राष्ट्रवादीकडे काणाडोळा; भाजपवर तोफा डागा!!

    STORY BEHIND SAMNA EDITORIAL: तळमळ! शिवसैनिक (कट्टर) संजय राऊत यांना काँग्रेसची चिंता – G 23 म्हणजे फक्त खाऊन ढेकर देणारे-राहुल गांधींची पाठराखण- तर ‘कश्मीर फाईल्स’म्हणजे ‘प्रपोगंडा’ ….