विशेष प्रतिनिधी
मुंबई : जनता कर्फ्यूला लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे पण मोठ्या शहरांमधून गावाकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर मात्र गर्दी दुर्दैवाने कायम आहे. रेल्वेने देशभरात ११०३ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. याची अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाने मीडिया मधून तसेच सोशल मीडियातून जाहीर करूनही दिल्ली, मुंबई, मद्रास, कोलकाता, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये रेल्वे स्थानके भरलेली आहेत. कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या भीतीने शहरांमधून गावाकडे जाऊ नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी करूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहरे, गावे बंदच्या बाबतीत मात्र लोकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलेला दिसतो आहे.
२२ ते ३१ मार्चपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व, पश्चिम, हाबर सेवेतून सामान्य प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे आदेश काढले आहेत. अत्यावश्यक सेवेच्या कर्मचार्यांना मात्र प्रवासाची मूभा राहील. रेल्वे स्थानकांवर त्यांची ओळखपत्रे पाहून त्यांना परवानगी देण्यात येईल. बाकीच्या प्रवाशांवा प्रवास करण्यासाठी मनाई असेल.