वृत्तसंस्था
बिजींग : कोरोना विषाणूचा उद्रेक ज्या चीनमधून जगभर पसरला त्याच चीनमध्ये हंता या विषाणूने एकाचा बळी घेतल्याचे मंगळवारी (ता. 24) उघडकीस आले.
चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने युनान प्रांतातील एक व्यक्ती शाडोंग प्रांतात बसमधून जात असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे ट्वीट केले आहे. या घटनेनंतर या बसमधल्या सर्व 32 प्रवाशांचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
हंता विषाणू आहे कसा
केंद्रीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने दिलेल्या माहितीनुसार हंता विषाणू हा प्रामुख्याने उंदरांमुळे पसरणाऱ्या विषाणूंच्या कुळातील आहे. यामुळे माणसाला अनेक आजार होण्याची भीती असते. हंता विषाणूमुळे फुप्फुसाचे तसेच रक्ताचे विकार होऊ शकतात. शरीरातंर्गत रक्तस्त्राव होण्याची भीती असते. या विषाणूचा प्रसार वायुजन्य नसतो. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे मल, मूत्र, लाळ किंवा उंदीर व त्याचे मल-मूत्र यांचा संपर्क झाल्यास हंता विषाणूची लागण होते.
हंताची लक्षणे
ताप येणे, स्नायूंना वेदना, डोकेदुखी, आळसावलेपण, शक्तीपात यासारखी लक्षणे हंता विषाणूची लागण झाल्यानंतर दिसतात. यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यू होऊ शकतो. याची सुरुवात खोकला, घशाला खवखव, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणे या पद्धतीने होते. रक्तदाब कमी होणे, झटके येणे, अंतर्गत रक्तस्त्राव आणि किडनी निकामी होणे, ही देखील लक्षणे आहेत. या विषाणूची लागण झाल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचा दर 38 टक्के आहे. हंता विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा प्राथमिक उपाय आहे. उंदरांच्या संपर्कात न येण्याची काळजी घेतली पाहिजे. हा विषाणू माणसाकडून माणसाकडे संक्रमित होत नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे.