आनंदाचा पाडवा : महापालिकेसह नायडू रुग्णालयातील डॉक्टरांना आले यश
विशेष प्रतिनिधी
पुणे : जगभर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्री पासून देशात 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. त्याच्या दुसर्याच दिवशीचा गुढी पाडवा पुणेकरांसह राज्यातील नागरिकांसह आनंदवार्ता घेऊन आला आहे. पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेणार्या राज्यातील पहिल्या कोरोना रुग्ण दाम्पत्यासह त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी असे पाचही जण खणखणीत बरे झाले आहेत. या सर्वांचे रिपोर्ट ‘निगेटीव्ह’ आले असून या दाम्पत्याला पाडवा साजरा करण्यासाठी बुधवारी घरी सोडण्यात येणार आहे. उर्वरीत तिघांना गुरुवारी घरी सोडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी ही माहिती दिली. “पुण्यातील पाच रुग्ण उपचार घेऊन पुर्ण बरे झाल्याचे समाधानाची आहे. पालिका, जिल्हाप्रशासन, डॉक्टर्स यांनी केलेल्या उपाययोजनांचे हे फलित आहे. नागरिकांना काही लक्षणे दिसल्यास आमच्याशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. ही उपचार पद्धती सोपी असून रुग्ण बरे होतात. भीती बाळगण्याचे कारण नाही. ज्या रुग्णांना आता घरी सोडण्यात येणार आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यांना चौदा दिवस होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत,” असे अगरवाल यांनी स्पष्ट केले
होळीच्या सुमाराला पुण्यात राज्यातील पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याला नायडू रुग्णालयात उपचारांसाठी ९ मार्चला दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णाची पत्नीही कोरोना बाधित झाली. विदेशवारी करुन आलेल्या या दाम्पत्याची मुलगी आणि हे दाम्पत्य मुंबईहून पुण्याला ज्या कॅबमधून आले त्या कॅबचा चालक हे सुद्धा कोरोनाबाधित झाले. या दाम्पत्यासह विदेशवारी केलेला आणखी एक सह प्रवासी सुद्धा बाधित होता. यामुळे पुण्यात चिंतेचे वातावरण होते.
या सर्वांना डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. चौदा दिवसांनंतर दाम्पत्याच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यावर दुस-यांदा हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्टही निगेटीव्ह आल्याने हे दाम्पत्य पुर्णपणे बरे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना बुधवारी गुढी पाडव्याच्या दिवशीच घरी सोडण्यात येत आहे.
त्यांच्या संपर्कातील त्यांची मुलगी, कॅब चालक आणि सह प्रवासी यांचेही चौदा दिवसांनंतरचे पहिल्या नमुन्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यांचा दुसरा अहवाल बुधवारी संध्याकाळपर्यंत मिळणार असून हे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास त्यांनाही गुरुवारी घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
महापालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून डॉ. नायडू रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुण्यातील रुग्णांचा आकडा १९ असून त्यातील पाच रुग्ण बरे झाल्याने हा आकडा १४ पर्यंत खाली आला आहे. ज्यांना घरी सोडण्यात येणार आहे त्या रुग्णांना आणखी चौदा दिवस होम क्वॉरंटाईन करुन राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत. यासोबतच त्यांच्या घराबाहेर होम क्वॉरंटाईनचे स्टिकर लावण्यात आल्याचे अतिरीक्त आयुक्त अगरवाल यांनी सांगितले.
दरम्यान, नागरिकांनी सोशल डिस्टस्टिंग ठेवून वागावे असे प्रशासनाने सांगितले आहे. संशयितांना डॉ. नायडू रुग्णालयासह शहरातील अकरा रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांना होम क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे.