विशेष प्रतिनिधी
पुणे : ”काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतांनाही काही मुस्लीम बांधव अडमूठेपणा करीत मस्जिद, टेरेसवर सामुदायिक नमाज पठण करीत असल्याचे लक्षात आले आहे. “सब कुछ अल्लाह के मर्जीसे होगा, वह बचाने वाला है” वगैरे वक्तव्य करुन दुआ करायला सांगत आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लिमांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे,” असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे.
काही मुस्लीम अंधश्रद्धाही पसरवत आहेत. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहीजे. मंदिर ,चर्च, बंद आहे. मशिदी पण बंद ठेवल्या पाहिजेत, असे आवाहन या मंडळाने केले आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी भान ठेवण्याची अपेक्षा मुस्लीमांकडून व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनला संपूर्ण देश प्रतिसाद देत आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन या हिंदूबहूल देशात वाराणसीच्या काशी विश्वेशवरापासून पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. काही चर्चंनी सुरवातीला दाखवलेला अडमुठेपणा बाजूला ठेवत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मशिदी अजूनही मोठ्या प्रमाणात उघड्या आहेत. एवढेच नव्हे तर या मशिदींमधून सामुहिक नमाजासाठी मोठी गर्दी जमत आहे. अल्लाच्या इच्छेशिवाय काही घडत नाही, असे सांगणारे व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत. काही मुस्लीमांच्या या धर्मवेडेपणाचा फटका संपूर्ण समाजाला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे आवाहन अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे.
डॉ. तांबोळी यांनी म्हटले आहे की, आज जगात करोना विषाणुने थैमान घातले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमूखी पडत आहेत. शासन – प्रशासन यंत्रणा सर्व स्तरावर सर्व शक्तीनिशी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतांनाही हतबल झाले आहेत. अनेक मुस्लीम देश सर्व प्रकारच्या सामुदायिक प्रार्थना, धार्मिक सण, जुम्माचा नमाज मशिदीमध्ये मध्ये अदा न करता आपआपल्या घरी अदा करण्याचा उपदेश करीत आहेत. माननीय पंतप्रधान आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करुन मंदिर, मशीद, दर्गा, चर्च, विहार, गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लोकांनी आपआपल्या घरात थांबून स्वतःची काळजी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. या भयावह वातावरणात आरोग्य, प्रशासन, पोलीस क्षेत्रातील अधिकारी – कर्मचारी जीवाची बाजी लावून ही महामारी रोखण्यासाठी तसेच रुग्णाःवर उपचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.
काही काही मुल्ला, मौलाना, मौलवी यांनी पत्रके काढून मुस्लीम समाजाला शुक्रवारची नमाज आणि शब्बेबरात नमाज आपआपल्या घरी अदा करण्याचे आवाहन केले आहे. असे असतांनाही काही मुस्लीम बांधव अडमूठेपणा करीत मस्जिद, टेरेसवर सामुदायिक नमाज पठण करीत असल्याचे लक्षात आले आहे. “सब कुछ अल्लाह के मर्जीसे होगा, वह बचाने वाला है” वगैरे वक्तव्य करुन दुआ करायला सांगत आहेत, अंधश्रद्धाही पसरवत आहेत. अशा वर्तनामुळे काय हाहाकार माजणार आहे याचे गांभीर्य विचारात घेऊन मुस्लीम बांधवांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेण्याचे भान बाळगले पाहिजे. मुस्लीम बहुल वस्तीत सार्वजनिक शिस्तीचे कठोर पालन करण्याची गरज आहे. जग थांबले आहे आपणही थांबले पाहीजे. देश आणि मानवतेसमोरील हे युध्द लढतांना सर्वांसोबत मुस्लीमांनी सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळाने केले आहे.