विशेष प्रतिनिधी
भोपाळ : Shivraj Singh’s statement : काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हनुमान हे पहिले अंतराळवीर असल्याचे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. हा वाद शांत होत नाही तोच आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर नव्या वादाला तोंड फोडले आहे.
शिवराज सिंह चौहान यांचे वक्तव्य
भोपाळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) यांच्या दीक्षांत समारंभात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, “प्राचीन काळी भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके प्रगत होते की, राइट बंधूंनी पहिले विमान बनवण्यापूर्वीच भारताकडे पुष्पक विमान होते.” या विधानामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, बाजूने आणि विरोधात असे दुतर्फा वाद सुरू झाले आहेत.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानावर सोशल मीडियावर दोन गटांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. काहींनी भारतीय संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे सरकारचे कर्तव्य असल्याचे सांगत, सध्याचे सरकार लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाऐवजी धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. दुसरीकडे, अनेकांनी चौहान यांच्या समर्थनात मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, प्राचीन भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होते, हे सत्य आहे. चौहान यांनी याची जाणीव करून दिल्याने काहीही चुकीचे घडले नसल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
पुष्पक विमान खरेच होते का?
भारतीय पुराणकथा आणि महाकाव्यांमध्ये पुष्पक विमानाचा उल्लेख आढळतो. विशेषतः रामायणात रावणाने सीतेचे अपहरण करण्यासाठी पुष्पक विमानाचा वापर केल्याचे वर्णन आहे. तसेच, इतर अनेक महाकाव्यांमध्येही या विमानाचा उल्लेख आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठाला अशाच विमानातून गेल्याच्या आख्यायिकाही प्रचलित आहेत. या उल्लेखांमुळे पुष्पक विमानाच्या ऐतिहासिक सत्यतेवर चर्चा होत आहे.
नव्या वादाला तोंड
चौहान यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे. काहींच्या मते, सरकार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याऐवजी अशा विधानांद्वारे लोकांमध्ये धार्मिक भावना भडकवत आहे. तर दुसरीकडे, अनेकांचा असा दावा आहे की, भारत अनादी काळापासून वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत होता आणि याची जाणीव करून देण्यात काहीही चुकीचे नाही.
या प्रकरणाने समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा घडवली असून, येत्या काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Shivraj Singh’s statement creates a stir on social media
महत्वाच्या बातम्या