विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी विकृत पद्धतीने रेखाटलेली श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे ऐन गणेशोत्सवात ‘अस्त गुरु’ या संस्थेने ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी ठेवली होती. या लिलाव करणार्या संस्थेद्वारे 29 आणि 30 ऑगस्टला ‘ऑनलाईन’ पद्धतीने पुकारलेल्या लिलावातील ही चित्रे अद्याप विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी ‘अस्त गुरु’ या संस्थेच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. लिलावाच्या आयोजकांनाही लिलाव त्वरित थांबवण्याची विनंती करण्यात आली आहे.
पोलीस तक्रारीत डॉ. उदय धुरी यांनी म्हटले आहे की, चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी त्यांच्या कारकीर्दीत भारतमाता, तसेच हिंदूंच्या अनेक देवदेवता यांची यांची नग्न, अश्लील आणि विकृत चित्रे रेखाटून देवतांचा आणि भारतमातेचा घोर अपमान केला होता. या विरोधात देशभरात हिंदूंनी संतप्त आंदोलने केली होती. तसेच देशभरात साडेबाराशेहून अधिक ठिकाणी पोलीस तक्रारी दाखल केल्या होत्या.
हुसेन यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे, अश्लील साहित्य विकणे, राष्ट्रीय अखंडता धोक्यात आणणे, राष्ट्रीय मानचिन्हांचा अवमान करणे यांसाठी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
‘अस्त गरू’ या संस्थेने नुकत्याच लिलावात काढलेल्या चित्रांमध्ये ‘ओम श्री गणेश नमन’ नावाच्या चित्रामध्ये श्री गणेशाच्या पुढे सरस्वतीदेवी वीणावादन करत असून श्री गणेशाला बिथरलेले आणि भयभीत झालेले दाखवण्यात आले आहे. तसेच या चित्रात श्री गणेशाचे दोन हातच दिसत आहेत. ‘शंकरा’ नावाच्या चित्रामध्ये भगवान शिव विवस्त्र बसलेले असून बाजूला नाग दाखवण्यात आला आहे. यामध्ये भगवान शिवाला प्राण्याचे तोंड लावण्यात आले आहे.
श्री गणेशाच्या चित्राचे मूल्य अंदाजे 75 ते 88 लाख रुपये, तर भगवान शिवाच्या चित्राचे मूल्य अंदाजे 70 ते 80 लाख रुपये निश्चित केले आहे. तरी पोलिसांनी ऐन गणेशोत्सवात श्री गणरायाचे आणि भगवान शिवाचे चाललेले ही विटंबना त्वरित थांबवावी आणि लिलावाच्या आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी घाटकोपर येथील पूनम जाधव यांनी ‘ऑनलाईन’ लिलावाचे आयोजकांना कायदेशीर कारवाईची नोटीसही पाठवली आहे. तसेच हिंदुराष्ट्रसेनेचे प्रकाश सावंत, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भोसले, हिंदू गोवंश रक्षा समितीचे दीप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक बळवंत पाठक यांसह अनेकांनी आयोजकांकडे निषेध नोंदवला आहे.