दोषींना अशी शिक्षा केली जाईल की जग त्याकडे उदाहरण म्हणून बघेल; योगींचा इशारा

  • आया बहिणींना छेडणाऱ्यांचा नाश निश्चित”

वृत्तसंस्था 

लखनौ : हाथरस बलात्कार – हत्या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार चहुबाजूंनी घेरले असताना आता स्वत: योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे भाष्य केले आहे. दोषींना अशी शिक्षा करू की भविष्यात ती उदाहरण ठरेल, असे ट्विट योगींनी केले आहे.

या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करु न दिल्याने देशभरामध्ये या प्रकरणावरून योगी सरकारवर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर योगींनी ट्विटरवरून पहिल्यांदाच हे भाष्य केले आहे.

ते म्हणतात, “उत्तर प्रदेशमधील सर्व आया-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला छेडण्याचा प्रयत्न करण्याचा विचारही करणाऱ्याचा नाश निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा केली जाईल की भविष्यात याकडे उदाहरण म्हणून पाहिले जाईल. तुमचे उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणीची सुरक्षा आणि विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे. हा आमचा संकल्प आहे आणि वचनही आहे.”

हाथरसमधील हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच विरोधकांनी योगी सरकारवर टीकेचा भडीमार केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरुवारी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन हाथरसमध्ये जाण्यास परवानगी दिली नाही. हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यामुळेच काँग्रेसविरुद्ध भाजपा असा थेट संघर्ष या प्रकरणावरून झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसबरोबरच आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना यासारख्या भाजपाविरोधी पक्षांनी या प्रकरणावरुन योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

नक्की काय घडलं?

उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या मृतदेहावर मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार केले, अस आरोप आहे. १९ वर्षांच्या तरुणीवर १५ दिवसांपूर्वी हाथरसमधील चौघा उच्चवर्णीयांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर पोलिसांनी परस्पर या मुलीचे अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

चार संशयितांनी पीडितेवर अत्याचार करुन अत्यंत क्रूरपणे तिला जखमी केले. तिच्याच ओढणीने गळा दाबून ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जबर जखमी झालेल्या या मुलीला अलिगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात थोडय़ा वेळासाठी शुद्धीवर आल्यावर मुलीने संशयित आरोपींची नावे सांगितली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली.

तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणले गेले, पण उपचारादरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. व्यथित झालेले तिचे वडील आणि भावाने सफदरजंग रुग्णालयाच्या आवारातच धरणे आंदोलन सुरू केले होते. पण रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून दिल्लीपासून २०० किमीवर असलेल्या त्यांच्या मूळ गावी नेले. त्यांच्यासोबत मुलीचे पार्थिवही रुग्णवाहिनीतून नेण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता किंबहुना त्यांना कोणतीही कल्पना न देता सफदरजंग रुग्णालयातून परस्पर नेल्याचा आरोप मृत मुलीच्या भावाने केला आहे.

गावात मृतदेह पोहचला तेव्हा…

पीडितेचा मृतदेह गावी आणल्याचे समजताच मोठय़ा संख्येने गावकरी जमा झाले.  हिंदू परंपरेप्रमाणे पार्थिव घरी नेले जावे, नातेवाईकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्यविधी केला जावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली. पीडितेच्या आईने तसेच, नातेवाईकांनीही पोलिसांना अडवून पार्थिव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

नातेवाईक व गावकऱ्यांनी बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्याची केलेली विनंतीही पोलिसांनी मान्य केली नाही. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घरात जमलेल्या नातेवाईक गावकऱ्यांना पोलीस अंत्यसंस्कार तातडीने करण्याची गरज असल्याचे सांगत होते. पोलिसांचा दुसरा चमू अंत्यसंस्काराची तयार करत होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. हे पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यावर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या दुसऱ्या भावाने केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी ‘नाकाबंदी’ केली असल्याने प्रत्यक्ष अंत्यसंस्कार होत असताना पोलिसांव्यतिरिक्त कोणालाही तिथे जाता आले नाही. आई-वडील व अन्य नातेवाईकांच्या गैरहजेरीत पोलिसांनी अंत्यसंस्कार केले, असा अरोप होतो आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*