जगभरातील चीनविरोधाचा भारताला निर्यातीत फायदा; सप्टेंबरमध्ये ५% वाढ

  • भारतीय अर्थचक्र जलद पूर्वपदावर येण्याचे संकेत

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : जगभरातील चीनविरोधी भावनेचा भारताला निर्यातीत फायदा झाल् आहे. देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता आर्थिक बाबी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. सलग सहा महिन्यांच्या घसरणीनंतर देशातील निर्यातीत वार्षिक आधारावर ५.२७% टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. देशातील निर्यात सप्टेंबर महिन्यात वार्षिक आधारावर ५.२७ टक्क्यांनी वाढून २७.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे जलद गतीने पूर्वपदावर येण्याचे संकेत आहेत. निर्यात ही कोरोना महामारीच्या पूर्वीच्या स्तरावर पोहोचली असल्याचे गोयल यांनी सांगितले.

“मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड : भारतातील निर्यात सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत ५.२७% वाढली आहे,” असं गोयल म्हणाले. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. सप्टेंबर २०१९ मध्ये भारताची निर्यात २६.०२ अब्ज डॉलर्स इतकी होती. परंतु करोनाच्या महासाथीमुळे जागतिक स्तरावरही मागणीत घट झाली होती. मार्च महिन्यापासूनच निर्यातीत मोठी घट पाहायला मिळाली होती. पेट्रोलियम, अभियांत्रिकी सामान, चामड्याच्या वस्तू, रत्न आणि दागिन्यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले होते.

“देशातील निर्यात आता पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारही आता खुला होत आहे आणि खरेदीदारांनी ऑर्डर देणं सुरू केलं आहे. अन्न व कृषी क्षेत्राची निर्यात पूर्वीप्रमाणेच सुरू राहील कारण त्यांनी करोनाच्या काळातही चांगली कामगिरी बजावली होती,” अशी माहिती टीपीसीआयचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली.

जगातील चीनविरोधाचा फायदा

“ही निर्यातवाढ आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. अनेक देशांमध्ये असलेल्या चीनविरोधी भावनेमुळे अनेक ऑर्डर मिळाल्या आहेत. जर भारताने वस्तू निर्यात योजना (एमईआयएस), जोखीम निर्यात आणि आरओडीटीईपी (निर्यात उत्पादनांवरील शुल्क अथवा करात सूट) यावर काही मार्ग काढले गेले यात अधिक चांगली वाढ होऊ शकते,” असे मत निर्यातदारांची सर्वोच्च संस्था फियोचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी व्यक्त केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*