महिला आयोग अध्यक्षांच्या नियुक्ती बाबत यशोमती ठाकूरांच्या पत्रांची दखलच नाही

  • महिला आयोगाच्या अध्यक्षांची ८ महिने झाले तरी अद्यापही नियुक्ती नाही; यशोमती ठाकूर यांना खंत

विशेष प्रतिनिधी

अमरावती : बलात्कार प्रकरणांवरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली.

मात्र अद्यापही अध्यक्षाची नेमणूक झाली नसल्याची खंत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याच सरकारबाबत व्यक्त केली आहे. लवकरच सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतील, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, करोना संकटाच्या काळातही घरगुती हिंसाचार, कार्यालयस्थळी लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि नेत्यांना मी  पत्रे लिहिली, पण अजून महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुहूर्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सापडलेला नाही.

भाजप सरकारमध्ये विजया रहाटकर या राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, मात्र त्यांनी ४ फेब्रुवारीला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. परंतु अध्यक्ष नेमण्यासाठी सर्व जण एकत्र येऊन लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*