विजय वडेट्टीवार गेले, अजित पवार आले पण सारथी चालेना, मराठा तरुणांची कोंडी कायम

सारथी संस्थेच्या विरोधात मराठा संघटनांनी केलेल्या तक्रारींचे निमित्त करून अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांना हटवून सारथीचा कारभार हातात घेतला. मात्र, अजूनही सारथी संस्थेच्या निधीचा प्रश्न सुटलेला नाही. मराठा तरुणांची कोंडी कायमच आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : सारथी संस्थेच्या विरोधात मराठा संघटनांनी केलेल्या तक्रारींचे निमित्त करून अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांना हटवून सारथीचा कारभार हातात घेतला. मात्र, अजूनही सारथी संस्थेच्या निधीचा प्रश्न सुटलेला नाही. मराठा तरुणांची कोंडी कायमच आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मराठा समाजाच्या तरुणांना शैक्षणिक मदत करण्यासाठी स्थापन आली आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सारथी संस्थेला मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याविरुध्द मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या वेळी इतर मागासवर्गीय (ओबीसी) असलेले मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवून अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतली. आपल्या नेहमीच्या शैलीत आठ कोटी रुपयांची मदत जाहीर करून टाकली. परंतु, हे नुसतेच आश्वासन राहिल्याचे आता स्पष्ट होत आहे.

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जानेवारीपासून जूनपर्यंतच्या कालावधीतील फेलोशिप मिळालेली नाही. संशोधन करताना अन्य कुठली नोकरी न करण्याची अट असल्याने आणि अधिछात्रवृत्ती रखडल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. यातील अनेकांवर कुटुंबाची जबाबदारी असून बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.
सारथी संस्थेच्या माध्यमातून ५०३ विद्याार्थी संशोधन करत आहेत. बहुतांश विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून आले आहेत. काही विद्यार्थी पूर्वी खासगी नोकरी करायचे.

मात्र, सारथीतून संशोधक म्हणून उच्चशिक्षण घेत असताना नोकरी न करण्याची अट आहे. त्यानुसार सर्वांनी पूर्वीच्या आपल्या नोकऱ्याही सोडून दिलेल्या आहेत. चीनी व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच या विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली आहे. त्यामुळे अनेकांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे पुढचे शिक्षण सोडून कोठेतरी रोजंदारीवर कामावर जाण्याची वेळ या विद्यार्थ्यांवर आली आहे.

सारथी संस्थेने नुकतीच १३० कोटींची मागणी केल्याचा मुद्दा मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला असून जादा निधीचीही आवश्यकता भासल्यास तरतूद केली जाईल, असाही राज्यपातळीवर घेण्यात आलेला निर्णय आहे. मात्र, हा निधी अद्याप संस्थेकडे पोहोचलेला नाही. महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेकडे दुर्लक्ष केले असून मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी ही संस्था बंद करण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा संघटनांनी केला होता.

सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या अखत्यारित असलेल्या नियोजन विभागाकडे सारथीचा कारभार घेतलाही. मात्र, त्यांना अद्याप संस्थेकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*