भंडारा, यवतमाळ, नागपूर; आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे भरपूर!!

यवतमाळमध्ये मुलांना सॅनिटायझर पाजताहेत, नागपूरात हॉस्पिटलच्या वॉर्डात कुत्री शिरताहेत… थांबा मंत्री – अधिकारी चौकशी करताहेत!! महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघताहेत


विशेष प्रतिनिधी

नागपूर : यवतमाळमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये पोलिओ लसीकरण मोहिमेत मुलांना पोलिओचे डोस पाजण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्याचा प्रकार समोर येऊन तो चौकशीच्या थंड्या बस्त्यात गुंडाळला जातोय ना जातोय तोच दुसरा असाच प्रकार समोर आलाय. नागपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटने भरलेल्या वॉर्डात भटकी कुत्री शिरल्याचा विडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर सरकारी यंत्रणा जागी होऊन चौकशीचे आदेश दिले गेलेत.Video of stray dogs inside patient ward at Government Medical College(GMC) Nagpur goes viral

पण मूळात या अशा घटनांनी अख्ख्या महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेच्या अब्रुचे धिंडवडे निघाताहेत त्याची चौकशी ना मंत्री करताहेत… ना अधिकारी करताहेत… फक्त काही कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून निलंबनाची काडीने औषध लावण्याच्या कारवाया मात्र केल्या जाताहेत.

आधी भंडाऱ्यात १० अर्भके आगीत होरपळून गेली… भंडाऱ्याच्या हॉस्पिटलचा दीड कोटी रूपयांचा प्रस्ताव ठाकरे – पवार सरकारने रख़डत ठेवला. मुख्यमंत्री – मंत्री – आमदारांच्या सांत्वन दौऱ्यावर ६ कोटी रूपये खर्च केले. कर्मचाऱ्यांनी बिर्याणी पार्टी करून घेतली… चौकशीच्या निष्कर्षांतून तिथेही काडीने औषध लावून काही कर्मचारी निलंबित केले. पण मूळ दीड कोटी रूपयांचा हॉस्पिटल यंत्रणा सुविधा प्रस्ताव मंत्रालयात रखडत का पडला, याची ना चौकशी झाली… ना त्यावर कारवाई झाली.

यवतमाळमध्ये पोलिओ डोसऐवजी ५ मुलांना सॅनिटायझर पाजले. मुलांना त्याचा त्रास झाल्यावर प्रकार लक्षात आला. तोपर्यंत पाजले ते सॅनिटायझर होते, हे सरकारी यंत्रणेतील कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या गावीही नव्हते. चौकशीचा फार्स होऊन काही कर्मचारी निलंबित केले. पण मूळात पोलिओ डोस आणि सॅनिटायझर यातला फरक न कळणारे कर्मचारी नेमले कोणी… त्यांनी नेमके ते कसे नेमले… त्याची मोडस ऑपरेंडी काय होती… याचा कोणी आणि कुठे तपास केला, माहिती नाही.

आणि आता नागपूरात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये दोन भटकी कुत्री पेशंटने भरलेल्या वॉर्डात शिरली. त्यांनी झोपलेल्या पेशंटला हुंगले. ती आरामात वॉर्डात फिरत राहिली. कोणी तरी एकाने त्याचा विडिओ काढून व्हायरल केला. त्यापैकी एका फोटोत तर वॉर्डाच्या दरवाजातील खुर्चीत सुरक्षा रक्षक झोपलेला दिसतोय.

आणि आता विडिओ व्हायरल झाल्यावर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणतात, या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करू. हे घडतेय विडिओ व्हायरल झाल्यावर. म्हणजे कोणी विडिओ काढला नसता… तो व्हायरल केला नसता… तर असा प्रकार बाहेर कळलाच नसता. आणि कळला असता तरी तो तिथल्या तिथे दाबला असता, असे म्हणण्यास वाव आहे.

कोरोना काळात आरोग्यमंत्र्यांनी चांगले काम केल्याबद्दल कौतूक झाले… हरकत नाही. पण ते कौतूक जितके खरे होते… तितक्याच आरोग्य यंत्रणांमधल्या त्रुटीही खऱ्या आणि गंभीर आहेत. त्याकडे कौतूक झालेल्या आरोग्यमंत्र्यांना तितकेच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज वाटत नाही का…

Video of stray dogs inside patient ward at Government Medical College(GMC) Nagpur goes viral

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*