विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉंग्रेसमधून नेत्यांची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पूर्वीचाच हिंसाचाराचा मार्ग सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले शांतीपूरचे माजी आमदार अरिंदम भट्टाचार्य यांना शुक्रवारी सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.Trinamool Congress is now on the road to violence threatening a former MLA who joined the BJP
वृत्तसंस्था
शांतिपूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉंग्रेसमधून नेत्यांची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे आता तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी पूर्वीचाच हिंसाचाराचा मार्ग सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले शांतिपूरचे माजी आमदार अरिंदम भट्टाचार्य यांना शुक्रवारी सकाळी जीवे मारण्याची धमकी मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. धमकी देणाराने त्यांना नाडिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्र तत्काळ सोडण्यास सांगितले आहे.
बांगला भाषेत दोन भिंतींवर धमक्या लिहिलेल्या दिसल्या आहेत. एक ठिकाण शांतिपूरच्या बागदेवी भागातील आहे, तर दुसरे ठिकाण बागचरामध्ये आहे. भिंतीवर लिहिलेली ही धमकी सर्वप्रथम पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाहिली. त्यात म्हटले आहे की, शांतिपूर सोडा, अन्यथा तुमच्या मृत्यूला तुम्हीच जबाबदार असाल.
भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त असलेल्या भट्टाचार्य यांनी म्हटले आहे की, अशा धमक्या माझ्यासाठी नवीन नाहीत. मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भाजपमध्ये सामील झाल्यापासून अशा धमक्या मिळत आहेत.
माझ्यावर हल्लाही झालेला आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली, परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही. मी पक्षाच्या वरिष्ठांना ही माहिती कळविली आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते मला घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यातील कायदा-व्यवस्था स्थिती बिघडल्याचे हे निदर्शक आहे. परंतु मी हार मानणारांपैकी नाही. मी शांतिपूरमधून पुन्हा निवडणूक लढविणार आहे.
२०१६ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकणारे माजी आमदार एक वषार्पूर्वीच तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. सत्तारूढ पक्षाबरोबर राहिल्यामुळे स्वतंत्ररीत्या काम करता येत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.