श्रीराम मंदिर भूमिपूजन; संघ परिवाराची उद्या दिवाळी; शिवसेना मात्र संभ्रमात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत


  • बाळासाहेबांच्या योगदानाची दिली आठवण

वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत असताना संघ परिवार दिवाळी साजरी करणार आहे. मात्र, राम मंदिराचे श्रेय घेण्यात भाजपशी स्पर्धा करणारी शिवसेना मात्र हा भूमिपूजनाचा सोहळा कसा साजरा करावा यासंदर्भात अजूनही संभ्रमात आहे.

‘आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस आहे. सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामूहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले. भूमिपूजनाचा सोहळा साजरा करण्यासंदर्भात भाजपने जय्यत तयारी केली आहे. मात्र, शिवसेनेच्या गोटात अजून सामसूम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहतील, अशी शिवसेना नेत्यांची अटकळ हाेती. मात्र, ठाकरे अयोध्येला जाणार नाहीत, असे सोमवारी खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात शिवसेना नेत्यांना विचारले असता, अजून नेतृत्वाकडून काहीच आदेश आलेले नाहीत, असे सांगण्यात आले. ‘आमचे साहेब अयोध्येला जाणार नाहीत, मग शिवसैनिकांनी कसा काय उत्सव साजरा करायचा’ असा सवाल ठाण्यातील एका शिवसेना आमदाराने केला. दुसरीकडे भाजप व संघ परिवारातील संघटनांनी भूमिपूजनाच्या दिवशी राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारला ते करणे अशक्य बनले आहे.

बाळासाहेबांच्या योगदानाची आठवण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी मंदिर न्यासाला लिहिलेले पत्र सोमवारी समोर आले. त्यात उद्धव यांनी राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान मोठे असल्याची आठवण न्यासाला करून दिली. तसेच मार्च महिन्यातील अयोध्या भेटीत उद्धव यांनी मंदिर निर्मितीसाठी १ कोटीचा निधी शिवसेना देईल, असे वचन दिले होते. तो १ कोटीचा निधी २७ जुलै रोजी न्यासाच्या अयोध्येतील स्टेट बँकेच्या खात्यात आरटीजीएसने पाठवला असल्याची माहिती पत्रात दिली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती