कोरोनायोद्ध्यांना राहण्यासाठी हॉटेल दिले म्हणून शिवसेनेच्या पोटात दुखले, अभिनेता सोनू सूदविरुध्द केली पोलीस तक्रार

अभिनेता सोनू सूदच्या प्रसिध्दीमुळे मुंबईमध्ये सर्वाधिक सेवाभावी कामे करत असल्याचा डंका पिटणाऱ्या शिवसेनेच्या पोटात दुखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनू सूदने कोरोनायोद्ध्यांना राहण्यासाठी निवासी इमारतीचे रुपांतर हॉटेलमध्ये केले होते. त्याचा गौरव करण्याऐवजी पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे. ShivSena sonu sood latest news


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता सोनू सूदच्या प्रसिध्दीमुळे मुंबईमध्ये सर्वाधिक सेवाभावी कामे करत असल्याचा डंका पिटणाऱ्या शिवसेनेच्या पोटात दुखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनू सूदने कोरोनायोद्ध्यांना राहण्यासाठी निवासी इमारतीचे रुपांतर हॉटेलमध्ये केले होते. त्याचा गौरव करण्याऐवजी पोलीसांत तक्रार करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने परवानगी न घेता जुहूमधील सहा माळ्यांच्या निवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरु केल्याचा मुंबई महापालिकेचा आरोप आहे. दरम्यान सोनू सूदने आपल्याकडे महापालिकेची परवानगी असून महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.महापालिकेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सोनू सूदने जुहूमधील परवानगी न घेता एबी नायर रोडवर असणारी सहा माळ्यांची रहिवासी इमारत शक्ती सागर बिल्डिंगचं रुपांतर हॉटेलमध्ये केलं आहे. सोनू सूदने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, बदल करण्यासाठी मी आधीच महापालिकेकडून परवानगी घेतली आहे. हा विषय महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीचा आहे. कोरोनामुळे परवानगी मिळू शकली नाही. यामध्ये कोणताही गैरकारभार नाही. मी नेहमीच कायद्याचं पालन केलं आहे. कोरोना संकटात हे हॉटेल कोरोना योद्ध्यांसाठी वापरण्यात आलं. जर परवानगी मिळाली तर मी पुन्हा याचं रुपांतर निवासी इमारतीत करेन. मी पालिकेच्या तक्रारीविरोधात हायकोर्टात जाणार आहे.

सोनू सूदने कोरोना संकटाच्या काळात हजारो मजूरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी खासगी बस उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्याबरोबर अनेक सामाजिक कार्यातही त्यानं हातभार लावला होता. संकटाच्या काळात सोनू सूद देवदूत ठरला होता. त्याच दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सोनू सूदवर टीका करण्यात आली होती. सोनू सूद भाजपचा प्यादा म्हणून काम करतोय की काय, अशी शंकाही शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आली होती. तसंच, सोनू सूद एकटा एवढं काम कसा करु शकतो, त्याच्याकडे अशी कोणती यंत्रणा आहे? असे सवालही शिवसेनेकडून उपस्थित होत होते. सोनू सूद बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी जाणार असल्याची अफवाही पसरविण्यात आली होती.

यामुळे सोनू सूदनं मातोश्रीत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसंच, त्यानं एक ट्विट करत त्याची भूमिकाही स्पष्ट केली. मला कोणत्याही राजकीय नेत्याचा किंवा पक्षाचा पाठिंबा नसून मी हे काम फक्त माणूसकीच्या नात्याने करतोय, असं त्यानं म्हटलं होतं. सोनू सूद शिवसेनेला खटकत असल्यानेच त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे प्रवक्ते राम कदम म्हणाले की, केवळ सूड भावनेतूनच सोनूविरोधात कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात जनतेला मदत करण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं होतं. त्यावेळी जे सरकारने करायला हवं ते काम सोनूने केलं होतं. सोनूने लोकांना प्रत्यक्ष भेटून मदत केली. त्यामुळे शिवसेनाचा जळफळाट झाला होता. त्यामुळेच सोनूवर कारवाई करण्यात आली.

ShivSena sonu sood latest news

आधी कंगनावर कारवाई केली. आता सोनू सूजवर कारवाई करण्यात येत आहे. हे ठाकरे सरकार आहे की सुडाचे सरकार? कंगनाच्या कार्यालयावर जेसीबी पाठवला. आता सोनूचा नंबर? गरीब मजुरांना स्वत:च्या पैशाने गावी पाठवण्याचं काम सरकारचं होतं. ते सोनूने केलं. त्याचा दोष काय? इतका द्वेष येतो कुठून? असा सवाल कदम यांनी केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*