औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेची कोंडी, कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून विरोध

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडूनच नामांतराला विरोध झाल्याने ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी शिवसनेची अवस्था झाली आहे. Shiv Sena Strongly Opposed By Congress and NCP over renaming of Aurangabad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडूनच नामांतराला विरोध झाल्याने ‘इकडे आड, तिकडे विहिर’ अशी शिवसनेची अवस्था झाली आहे.

औरंगाबाद महापालिकेत भाजपची सत्ता येताच पहिल्या बैठकीत नामांतराचा ठराव मंजूर करण्यात येईल, असे सांगून उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबादची नावे बदलणे अस्मितेचा प्रश्न आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवसेनेला पुढे पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे. हिंदुत्त्व सोडलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा चालू आहे.दुसरीकडे काँग्रेसला राज्यातील मुस्लिम व्होट बँक गमावण्याची भीती आहे. काँग्रेसची व्होट बँक संपवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला रस आहे.
औरंगाबादच्या पाठोपाठ पुणे, अहमदनगर आणि उस्मानाबादचेही नामांतर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नामांतर जिजापूर करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मात्र औरंगाबादऐवजी पुणे जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोध आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. त्याचप्रमाणे रिपाइं अध्यक्ष व मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांनीही नामांतरास विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा नामांतरास विरोध कायम आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यात नामांतराचा प्रस्ताव नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली आहे.

नामांतर करायचेच आहे तर राज्याचे करा. छत्रपती शिवाजी महाराष्ट्र असे नामांतर करा, अशी भूमिका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांनी स्पष्ट केली. नाव बदलून विकास होत नाही, असे सांगून औरंगाबादच्या नामांतरास सपाचा विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Shiv Sena Strongly Opposed By Congress and NCP over renaming of Aurangabad

महाविकास आघाडी सरकारने मध्यंतरी राज्यातील काही लाख वस्त्यांची व गावांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न शिवसेनेची कोंडी करणारा ठरतो आहे. शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव शिवसेनेने रेटल्यास काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकते. त्यामुळे शिवसेनेसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती आहे. औरंगाबाद मनपा हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार ५१.७५ टक्के हिंदू, ३०.७९ टक्के मुस्लिम, १५.१७ टक्के बौद्ध, १.६२ टक्के जैन व इतर धर्मीय लोकसंख्या आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*