शरद पवारांचा आणखी एक झटका, अजित पवारांच्या भाच्याला पक्षात घेण्यास नकार

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शेवटचा शब्द आपलाच असतो हे शरद पवारांनी दाखवून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाच्याला पक्षात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शेवटचा शब्द आपलाच असतो हे शरद पवारांनी दाखवून दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाच्याला पक्षात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांचे सख्खे बंधू पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगतसिंह यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. यामुळे पवार यांचा प्रचंड संताप झाला होता. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपा किंवा शिवसेनेत प्रवेश केला होता. पण पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशावरून पवारांना मोठा धक्का बसला होता.

नगरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडून चालले आहेत. त्यात तुमचे ‘नातेवाईक’ पद्मसिंह पाटील यांचाही समावेश आहे, असा प्रश्न विचारला. होता. या प्रश्नावर शरद पवार संतप्त झाले. ही सभ्यता नाही. तुम्ही माफी मागा. अन्यथा चालते व्हा, असे पवारांनी त्या पत्रकाराला सुनावले होते. तसेच जागेवर उठून जाण्यासही शरद पवार निघाले होते. याचे कारण म्हणजे पद्मसिंह पाटील पवारांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखळे जात होते.

सुरूवातीला जिल्हा परिषद, नंतर आमदारकी आणि मंत्रिपद, खासदार अशा वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केले होते. यातील राजकारणाबरोबरच शरद पवार यांच्या कुटुंबामध्येही तेढ निर्माण झाली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी पवार कुटुंबाचे मतभेद होण्यास तेव्हापासूनच सुरूवात झाली. अजित पवार यांना भाजपासोबत आणण्यातही राणा जगजितसिंह यांचा मोठा वाटा होता असे म्हणतात.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अजित पवार यांचा राणा जगजितसिंह यांना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा आणण्याचा प्रयत्न चालला होता. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. परंतु, शरद पवारांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही लोक येऊ इच्छीत आहेत. पण काही निकष आहेत. जसे उस्मानाबादचे. त्यांना हात जोडून विनंती की दिल्या घरी सुखी राहा, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे उस्मानाबाद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे माहेर असून त्यांच्यापासून दूरच राहायचा निर्णय शरद पवारांनी घेतल्याचेही म्हटले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*