Sharad Pawar claims that Deshmukh was in hospital During Feb 5 to 15, a video of the PC Held on Same Date By Deshmukh Shared by BJP

शरद पवारांचा दावा- 5 ते 15 फेब्रुवारी देशमुख रुग्णालयात होते, त्याच तारखेच्या पत्रपरिषदेचा व्हिडिओ भाजपकडून प्रसिद्ध

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे. दुसरीकडे, पवार जो दावा करत आहेत की, 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते तो कसा चुकीचा आहे हे भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्या 15 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे महाराष्ट्र सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. संपूर्ण विरोधी पक्ष राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

ते म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे वाझे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख आणि वाझे यांच्यात संभाषणे झाले, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

ते म्हणाले की, परमबीर सिंह तपासाची दिशा बदलण्यासाठी असे चुकीचे आरोप करत आहेत. पत्रात नमूद केलेल्या काळात वाझे आणि देशमुख यांच्यात संभाषण झाल्याचा पुरावा मिळालेला नाही, असेही ते म्हणाले.

नवाब मलिकांनीही केली पाठराखण

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक म्हणाले की, चौकशीनंतरच सत्य बाहेर येईल. तोपर्यंत देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मलिक म्हणाले की, प्रथम हे निश्चित झाले पाहिजे की परमबीर सिंग यांनी हे पत्र त्यांच्या बदलीनंतर का लिहिले? या पत्राच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, जेव्हा पैसे मागितले गेले तेव्हा देशमुख रुग्णालयात होते. मग ही बाब कशी आणि केव्हा घडली, याबद्दल परमबीर यांनी काहीही सांगितले नाही.

भाजपने शेअर केला त्याच तारखेचा व्हिडिओ

दुसरीकडे, पवार जो दावा करत आहेत की, 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान अनिल देशमुख रुग्णालयात होते तो कसा चुकीचा आहे हे भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी अनिल देशमुख यांच्या 15 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजप आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी अनिल देशमुखांचे 15 फेब्रुवारीचे एक ट्विट शेअर केले असून त्यामध्ये ते पत्रकार परिषदेत घेताना दिसत आहेत. अमित मालवीय यांनी असा सवाल केला आहे की, 5 ते 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांना रुग्णालयात दाखल केले गेले असेल, तर त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली?

असे आहे संपूर्ण प्रकरण

25 फेब्रुवारीला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलिया या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. सुरुवातीला हे दहशतवाद्यांशी संबंधित कृत्य असल्याचे म्हटले जात होते. परंतु लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेने हे प्रकरण ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि संशयाची सुई एपीआय सचिन वाझे यांच्यावर फिरली. यानंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्याही झाली. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. यानंतर याच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल एका पत्राद्वारे केली आहे. या पत्र प्रकरणामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*