वर्षभरात “साचलेले” मुख्यमंत्री आज बाहेर काढणार; शिवसेनेचा दसरा मेळावा धोरण ठरवण्याचा की भडास काढण्याचा?


  • संजय राऊत यांच्या विधानाचा अर्थ नेमका घ्यायचा कसा?
  • राऊत यांचे विधान दिशादर्शक? की मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या आजच्या दसरा मेळावा संदर्भात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यायचा? वर्षभरात जे “साचले” ते सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात बाहेर काढतील, असे खुद्द संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितले. या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? शिवसेनेसाठी हा दसरा मेळावा धोरण ठरवण्याचा आहे की गेल्या वर्षभरातली भडास काढण्याचा आहे?, हा प्रश्न संजय राऊत यांच्या विधानातून पुढे येतो. shivsena dasara melava

कोरोना लसीचे राजकारण करण्याएवढे उद्धव ठाकरे कोत्या मनाचे नाहीत, असे विधानही संजय राऊत यांनी केले आहे. परंतु, हे विधान करण्याची वेळच का आली? ही मात्र विचार करायला लागणारी बाब आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून दसरा मेळाव्यात बोलतील असे राऊत स्वतःच म्हणालेत. या विधाना एवढे विचित्र आणि विक्षिप्त विधान दुसरे नाही. महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे असे एकाच व्यक्तिमत्वात दडलेले दोन मुख्यमंत्री आहेत काय? मुख्यमंत्री हा कोणत्या पक्षाचा नसतो तो राज्याचा असतो हे वर्षानुवर्षे राहिलेल्या कार्यकारी संपादकांना सांगण्याची गरज का पडावी?

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसेनेच्या भविष्यकालीन धोरणाचा वेध घेणारा असे. बाळासाहेब आपल्या ठाकरी शैलीत त्यावेळी विरोधकांचा समाचारही घेत असत. परंतु प्रामुख्याने शिवसेनेची पुढची वाटचाल कशी राहील, याविषयी दमदार भूमिका मांडण्यात बाळासाहेब आघाडीवर असत.

shivsena dasara melava

उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा तिसरा मुख्यमंत्री सत्तेवर येऊनही शिवसेना “अग्र मार्गाने” जाण्यापेक्षा भडास काढण्याच्या “पुच्छ मार्गाने” जाते की काय?, अशी शंका संजय राऊत यांच्या विधानातून आली तर महाराष्ट्रातल्या जनतेचे किंवा शिवसैनिकांचे काय चुकेल? परंतु फक्त भाजप द्वेषाने पछाडले त्यामुळे की उद्धव ठाकरे यांना विशिष्ट प्रकारे अडचणीत आणण्यासाठी संजय राऊतांनी ही विधाने केली नसतील ना? असा प्रश्नही पडल्याशिवाय राहत नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था