अबू आझमींचा उध्दव ठाकरेंना उपदेश; औरंगाबादच्या नामांतराआधी महाराष्ट्राचेच नाव बदला; आझमींना समजावून सांगण्याची संजय राऊतांची मवाळ भूमिका

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पडली आहे. नामांतराचा हा वणवा आता महाराष्ट्रभर पसरताना दिसतोय. samajwadi party leader abu azmi opposed aurngabad renaming


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबाद नामांतराच्या वादात समाजवादी पक्षाने उडी घेत थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनाच उपदेश केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी ठाकरेंना महाराष्ट्राचेच नामांतर करण्याचा उपदेश केला आहे. त्याच बरोबर अहमदनगर, औरंगाबाद नावाला इतिहास आहे. तो पुसून चालणार नाही म्हणून दोन्ही शहरांच्या नामांतराला विरोधही केला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना पुन्हा एकदा नामांतराच्या मुद्द्याची ठिणगी पडली आहे. नामांतराचा हा वणवा आता महाराष्ट्रभर पसरताना दिसतोय. औरंगाबाद पाठोपाठ अनेक शहरांची नावे बदलण्याची मागणी होऊ लागली आहे. नामांतराच्या या मागण्यांवर आझमींनी भूमिका मांडत महाराष्ट्राचेच नाव बदलण्याची अजब सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी आम्ही अबू आझमींना समजावून सांगू, अशी मवाळ भूमिका घेतली आहे. शिवसेना पूर्वी आझमींविरोधात आक्रमक असायची.औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर ठाकरे – पवार सरकारमधील मतभेद भाजपने उघड्यावर आणले. त्यावर खुलासे देताना शिवसेनेची तारांबळ उडतीय. औरंगाबादमध्ये रस्त्यांवर फलक लावून नामांतर करण्यात येतेय. पण सरकारचा मुख्यमंत्री असूनही नामांतरावर सरकारी शिक्कामोर्तब करता येत नसल्याची शिवसेनेची कोंडी आहे.

शहारांची नावं बदलण्याची मागणी जोर पकडत असतानाच महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षानंही स्पष्ट भूमिका मांडत नामांतराला विरोध दर्शवला आहे. अबू आझमी यांनी एका व्हिडीओद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे. “शहरांची नावे बदलून कुणाचे पोट भरत नाही. शहरांना आवडीचे नाव ठेवायचेच असेल, तर नवी शहरे वसवून ठेवा. अहमदनगर किंवा औरंगाबादला एक इतिहास आहे. तो बदलून जबरदस्तीने नामांतर करणे योग्य नाही. नामांतर करायचेच असेल, तर आधी महाराष्ट्राचे नाव बदलून राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या. रायगडचे नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव द्या. लोकांनाही ते आवडेल. मात्र, केवळ काही लोकांना डिवचण्यासाठी नामांतर करणे हे आपल्याला शोभत नाही,” असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.

samajwadi party leader abu azmi opposed aurngabad renaming

“हे आपल्यासारख्याला शोभत नाही”
“महाराष्ट्रात जगभरातून, देशातून लोक येत असतात. तुम्ही राज्याला पुढे घेऊन जा. विकास करा. नवे जिल्हे निर्माण करा. लोक नक्कीच तुमचे कौतुक करतील. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करू नका. ते आपल्यासारख्याला शोभत नाही,’ असा टोलाही आझमी यांनी लगावला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*