रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज 2021 : इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज

  • लिजेंड्स दरम्यान रंगतदार उपांत्य सामना ; युवराज,सचिनची दमदार फलंदाजी ; इंडिया लिजेंड्सचा विजय

  • क्रिकेट लिजेंड्सला पुन्हा एकदा खेळताना पाहण्याची संधी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज 2021 मुळे क्रिकेट प्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे. या सिरीजच्या अंतिम सामन्यात सचिनच्या इंडिया लिजेंड्स स्थान मिळवले आहे. Road Safety World Series 2021: India Legends vs West Indies

विशेष प्रतिनिधी

रायपूर : बुधवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिज 2021 स्पर्धेत इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट लिजेंड्स संघात उपांत्य फेरीचा सामना रंगला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात इंडिया लिजेंड्सने 12 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच अंतिम सामन्यातील स्थानही पक्के केले आहे.

युवराज, सचिनची दमदार फलंदाजी

इंडिया लिजेंड्सकडून कर्णधार सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी डावाची सुरुवात केली. सेहवागने आपल्या चिरपरिचित अंदाजात पहिल्या चेंडूपासून चौकार-षटकार मारण्यास सुरुवात केली. पण तो 17 चेंडूत 35 धावा करुन बाद झाला. त्यानंतर, दुसऱ्या गड्यासाठी सचिन व मोहम्मद कैफ यांच्यादरम्यान 53 धावांची भागीदारी झाली.

कैफ 27 धावांवर बाद झाल्यानंतर युसूफ पठाणला चौथ्या क्रमांकावर बढती मिळाली. दरम्यान सचिनने सलग दुसऱ्या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 65 धावा केल्या.

सचिन बाद झाल्यानंतर युवराज सिंग फलंदाजीसाठी आला. 18;व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महेंद्र नागामुट्टूने त्याचा सोपा झेल सोडला. त्याचा फायदा त्याने पुढच्याच षटकात घेतला. नागामुट्टूने टाकलेल्या त्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर त्याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. चौथा चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुन्हा पाचव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. युवराजने अखेरच्या षटकात पुन्हा दोन षटकार लगावले. तो 20 चेंडूमध्ये 49 धावा काढून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत सहा षटकार व एक चौकार मारला.त्यामुळे इंडिया लिजेंड्सला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 218 धावा करता आल्या. वेस्ट इंडिज लिजेंड्सकडून टिनो बेस्टने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रायन ऑस्टिनने 1 विकेट घेतली.

या सामन्यात इंडिया लिजेंड्सने वेस्ट इंडिज लिजेंड्सला 219 धावांचे आव्हान दिले होते. पण वेस्ट इंडिज लिजेंड्सला 20 षटकात 6 बाद 206 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिज संघाकडून 219 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर विलियम पर्किंन्स 9 धावांवर बाद झाला होता. मात्र यानंतर ड्वेन स्मिथ नरसिंग देवनारायणला साथीला घेत वेस्ट इंडिजला भक्कम स्थितीत पोहचवले होते. या दोघांनी 99 धावांची भागीदारी केली. मात्र स्मिथ 36 चेंडूत 63 धावा करुन बाद झाला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

तो बाद झाल्यानंतर देवनारायणला कर्णधार ब्रायन लाराची चांगली साथ मिळाली. या दोघांनी 80 धावांची भागीदारी रंगली. त्यामुळे हा सामना वेस्ट इंडिज जिंकेल असे वाटत असतानाच लाराला 19 व्या षटकात विनय कुमारने त्रिफळाचीत केले. तसेच याच षटकात विनयने टिनो बेस्टलाही बाद केले.

अखेरच्या षटकात देवनारायण 44 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार मारत 59 धावांवर असताना धावबाद झाला. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा मावळल्या.

इंडिया लिजेंड्सकडून विनय कुमारने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच इरफान पठाण, मनप्रीत गोणी आणि प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

शेवटची 2 षटके रंगतदार

या सामन्यातील शेवटच्या 2 षटकात वेस्ट इंडिजला 25 धावांची गरज होती. त्यावेळी लारा आणि देवनारायण खेळपट्टीवर होते. 19 व्या षटकात विनय कुमारने गोलंदाजी केली. त्याच्या पहिल्या 2 चेंडूत 1 चौकारासह 6 धावा काढल्या. यावेळी इंडिया लिजेंड्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरने विनयशी चर्चा केली. त्यापुढच्या चेंडूवर लारा त्रिफळाचीत झाला. त्यानंतर बेस्टने 2 धावा काढल्या. पण तो 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. अखेरच्या षटकात 16 धावा हव्या असताना वेस्ट इंडिजला 2 धावाच करता आल्या.

रविवारी रंगणार अंतिम सामना

येत्या रविवारी(२१ मार्च) या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्याआधी १९ मार्चला दक्षिण आफ्रिका लिजेंड्स विरुद्ध श्रीलंका लिजेंड्स यांच्यात दुसरा उपांत्य सामना होईल. त्यांच्यातील जो संघ जिंकेल तो इंडिया लिजेंड्सविरुद्ध अंतिम सामन्यात खेळेल.

Road Safety World Series 2021: India Legends vs West Indies

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*