वृत्तसंस्था
मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प विकसाभिमुख असून मी त्याला 10 पैकी 10 गुण देतो, अशा शब्दात राकेश झुंझूनवाला यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन केले. तसेच भारतीय अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने प्रगती करेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.Rakesh Jhunjhunwala’s vote, 10 out of 10 for the Union Budget
भारतीय शेअर बाजाराच्या दलाला स्ट्रीटचे बिग बुल, अशी राकेश झुंझूनवाला यांची ओळख आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते.
अर्थसंकल्पाने अपेक्षेपेक्षा जास्त दिल्याचे सांगताना ते म्हणाले, भारताचा विचार केला असता हा अर्थसंकल्प वास्तववादी असून पुनर्रनिर्माण करण्याच्या दिशेने आहे. धडाकेबाज निर्णय घेतल्यामुळे 25 वर्षात भारत चीनलाही मागे टाकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदही केले.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी सरकार कठोर असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट दिसते.1991 च्या समाजवादी अर्थसंकल्पापेक्षा महत्वपूर्ण बदल यंदा दिसला आहे. यंदा करसंकलन चांगले होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी आर्थिक तूट 6 ते 6.5 टक्के राहील तसेच अपेक्षित असलेले सर्व भांडवल भारत गोळा करू शकणार नाही, असे ते म्हणाले.
शेअर बाजाराविषयी ते म्हणाले, अलीकडील सुधारणा ही वेगवान होती. हे बाजारातील एक वैशिष्ट्य आहे. सध्या बाजार तेजीत आहे. भारतावर विश्वास ठेवा. बाजारपेठ संधी देत आहे, ती हस्तगत करण्याची गरज आहे.
ते म्हणाले, आता सर्वच क्षेत्रात स्पर्धा सुरु होईल. तसेच त्यांची प्रगतीही होईल. निवृत्तीवेतन आणि सार्वभौम निधी पायाभूत सुविधा क्षेत्रात वळविण्याची गरज आहे.
सरकारी उद्योगातून निर्गुंतवणूक करण्याच्या धोरणाचे त्यांनी स्वागत केले असून हा निर्णय योग्य आहे. भांडवल विस्तार चक्र नुकतेच सुरू झाले आहे. या तिमाहीत त्यात 1 टक्के वाढ दिसून येईल. पुढील वर्षी ही वाढ झपाट्याने होईल, असे ते म्हणाले.