विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरात लवकर तोडगा काढण्याचा इशारा दिला आहे. पण… त्याचवेळी त्यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारची आठवण करून दिली आहे. त्यामुळे अमरिंदर सिंगांनी पंतप्रधानांना इशारा दिला आहे… की शेतकरी आंदोलकांना चिथावणी दिली आहे… की काँग्रेसची दुखती रग दाबली आहे… याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.punjab CM amrinder singh warns opration blue star during farmers agitation
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून राहात शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरू ठेवले आहे. केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांची दखल घेत नसल्याने आंदोलन चिघळेल, असा अमरिंदर सिंगांनी दावा केला आहे. पंजाबमध्ये असेच आंदोलन झाले होते. ते ४२ मागण्यांसाठी होते. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातून पंजाब प्रश्नाचा भडका उडाल्याची आठवण त्यांनी करवून दिली आहे. अमरिंदर सिंग यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारचे उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेने राज्याला ढकलून शकतो, असे त्यांनी बैठकीत सांगितले. ते म्हणाले, की सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला तोडगा काढावा लागेल. सीमेपलीकडून पाकिस्तानातून किती ड्रोन्स, शस्त्रास्त्रे आणि स्फोटके तस्करीच्या मार्गाने पंजाबमध्ये आणण्यात आली आहेत, याची आपल्याला माहिती आहे. ऑपरेशन ब्लू स्टार होण्याआधी ४२ मागण्यांवरून दोन महिने चर्चा चालल्यानंतर पंजाबमध्ये अशांतता निर्माण झाली होती. तसाच असंतोष धुसमतोय. याचा स्फोट होईल, असा इशारा अमरिंदर सिंग यांनी दिलाय.
पण ऑपरेशन ब्लू स्टारच्या वेळी केंद्रात इंदिरा गांधींचे सरकार होते. त्यांनी पंजाबमधील आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असे अमरिंदर सिंग यांना म्हणायचे आहे काय… किंबहुना तसे सूचवून अमरिंदर सिंगांनी काँग्रेसची दुखती रग दाबली आहे काय… किंवा केंद्र सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही तर त्यावेळी पंजाबमध्ये जसा दहशतवाद फुलवला तसे आता आंदोलक शेतकऱ्यांनी वागावे, असे अमरिंदर सिंग यांना सूचवायचे आहे काय… अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.