पुण्यात आता “political level playing field”; फडणवीस – अजितदादा – राज यांच्यात रोमहर्षक टक्कर; काँग्रेसचे नेतृत्व कुठे दिसतेय??

विनायक ढेरे

पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुण्यात लक्ष घालण्याची बातमी आली आणि खरोखरच पुण्याची लढत आत्तापासूनच रोमहर्षक टकरीत रूपांतरीत झाल्याचे वाटायला लागले आहे. पुण्यात बऱ्याच वर्षांनी दुहेरी नाही, तर तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस – अजितदादा पवार आणि राज ठाकरे या दिग्गजांमध्ये ही टक्कर असेल.pune will witness political fight among devendra fadanvis – ajit pawar – raj thackeray

राज ठाकरे यांचा करिष्मा त्यांनी मनसे स्थापन केल्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकीत चालला. मनसेचे २९ नगरसेवक त्यांनी पहिल्या धडाक्यात २०१२ मध्ये निवडून आणून दाखविले होते. आताही राज यांनी पुण्यात लक्ष घातल्याने लढतीत आत्तापासूनच जान आली आहे.

बालेकिल्ल्यात काँग्रेसचे नेतृत्व हरवलेले

पण या सगळ्यांमध्ये पुणे ज्या पक्षाच्या वर्षानुवर्षे बालेकिल्ला होता, त्या काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुठे दिसतेय? ते पक्षाच्या दुर्दैवाने दुर्बिण लावून शोधावे लागेल. १९९० च्या दशकात ते अगदी २०१० पर्यंत पुण्यात काँग्रेसचे नेतृत्व देशाने दखल घ्यावी असे होते. सुरेश कलमाडी हे पुण्याचे आतापर्यंतचे शेवटचे काँग्रेसचे नेते. त्यांच्यानंतर पुण्यात संपूर्ण शहरव्यापी नेतृत्वच उभे राहिलेले दिसले नाही. ते तसे काँग्रेसचेही शेवटचे खासदार. त्यानंतर पुण्याने काँग्रेसचा खासदार पाहिलेला नाही.महापालिकेतही सुरेश कलमाडींचे बरीच वर्षे एकमुखी नेतृत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने पुण्यात आत्तापर्यंतचे अखेरचे वैभवाचे दिवस पाहिले. अजितदादा पवार कलमाडींचा पराभव करून पुण्यावर वर्चस्व मिळवू पाहात होते, पण २०१४ मध्ये त्याला ब्रेक बसला. कलमाडींसारखा अजितदादांचा political dominance तयार होण्यापूर्वीच राष्ट्रवादीला पुण्यात भाजपने घरघर लावली. आज पुण्यात राष्ट्रवादीसह अन्य पक्ष फोडून भाजपने ९२ नगरसेवक निवडून आणून आपला संपूर्ण political dominance तयार केला आहे.आणि म्हणूनच पुण्यात आता खऱ्या अर्थाने political level playing field तयार झाले आहे. पुण्यातील सर्व पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला मर्यादा आहेत. कलमाडी खासदार होते. अण्णा जोशी, प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि आता गिरीश बापट हे पुण्याचे भाजपचे खासदार. पण कलमाडींसारखे नेतृत्व करणे यापैकी कोणालाही जमले नाही. कलमाडी नुसते खासदार नव्हते, ते सगळ्या पुण्याचे नेते होते. त्यांच्या आधी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ खासदार होते. ते देखील पुण्याचे नेते होते. पुणे महापालिकेत या दोन्ही नेत्यांचा शब्द अंतिम मानला जायचा.

त्याला अजितदादांनी सुरूंग लावला हे खरे आहे. पण कलमाडी आणि गाडगीळ या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या नंतर म्हणजे जवळ – जवळ प्रत्येकी १५ ते २० वर्षे जसा एकछत्री अंमल चालविला, तसा अंमल अजितदादांना ८-१० वर्षेच किंबहुना त्यापेक्षा कमीच वर्षे चालवता आला.

गिरीश – अंकुश – शांतिलाल… अर्थात गिरीश बापट, अंकुश काकडे आणि शांतिलाल सुरतवाला असा छोटा स्थानिक नेत्यांचा अंमलही पुणे महापालिकेने काही काळ अनुभवला. तो सर्वपक्षीय नेतृत्वाचा काळ होता.

आता मात्र, २०२२ च्या निवडणूकीत भाजप – राष्ट्रवादी – मनसेचे राज्य पातळीवरचे नेते लक्ष घालत आहेत. त्यांच्या पक्ष संघटनाही एकमेकांशी टक्कर घेण्याएवढ्या मजबूत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत आजही आहेत. पण त्यांना म्हणावे असे नेतृत्व उरलेले नाही. पण संघटनेमध्ये आहे त्या नेतृत्त्वाने जरी जान फुंकली तर काँग्रेस देखील मैदानात टक्कर द्यायला उतरू शकण्याइतपत मजबूतीने उभी राहू शकते.

pune will witness political fight among devendra fadanvis – ajit pawar – raj thackeray

त्यामुळेच बऱ्याच वर्षांनी खरे म्हणजे पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वच तुल्यबळ पक्षांची लढत पाहायला मिळणार आहे. आणि त्यांचे राज्यातले नेतेही तेवढेच तगडे आहेत. ते पुण्यात एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळणार आहे. पुण्यात शिवसेना फॅक्टर पहिल्यापासूनच फेड म्हणजे पुसट होता. शशिकांत सुतार, काका वडके, नंदू फडके हे नेते मोठे होते. पण संघटना शहरपातळीवर तेवढी मजबूतीने उभी राहू शकलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेचे शहर पातळीवरचा पक्ष म्हणून स्थान गृहीत धरता येत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*