सार्वजनिक उद्योग देशासाठी अभिमान, नफा वाढविण्यासाठी प्रयत्न – प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

सार्वजनिक उद्योग देशासाठी अभिमानाची बाब असून, त्यांची कार्यक्षमता, उलाढाल आणि नफा मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक आस्थापना विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सार्वजनिक उद्योग देशासाठी अभिमानाची बाब असून, त्यांची कार्यक्षमता, उलाढाल आणि नफा मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, सरकार प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक आस्थापना विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

जावडेकर आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते आत्मनिर्भर, स्वयं-पुनरुत्थान आणि कणखर भारत या शीर्षकाच्या पुस्तकाचे प्रदर्शन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या सार्वजनिक आस्थापनांनी कोविडच्या काळात दिलेल्या योगदानाविषयी हे माहिती संकलन आहे.

सार्वजनिक आस्थापनांनी कोविडच्या काळात केलेल्या कामांचे कौतुक करताना जावडेकर म्हणाले, चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात, वीजपुरवठा 99 टक्के होता, 24 हजार गॅस सिलेंडर वितरक, 71 हजार किरकोळ दुकाने यांनी सेवा देणे सुरु ठेवले होते. साडेसहा हजार एसकेओ डीलर्स सतत लोकांची सेवा करण्यास तत्पर आणि उपलब्ध होते. या संकटकाळातही, वस्तूंची वाहतूक शंभर टक्के आणि वस्तूंचे उत्पादन देखील शंभर टक्के ठेवले. याच काळात सुमारे 71 कोटी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला.

तेल विपणन कंपन्यांनी ग्राहकांना एप्रिल ते जून या काळात 21 कोटी मोफत गॅस सिलेंडर रिफील केले. त्याशिवाय 13 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली. 33 दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली. केंद्रीय सार्वजनिक कंपन्यांनी विविध ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचारासाठी 201 रुग्णालयांमध्ये सुमारे 11 हजार खाटा देखील दिल्या.

सध्या जेव्हा देशात सगळ्या गोष्टी हळुहळू पूर्ववत सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि आपण आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करतो आहोत. अशावेळी सार्वजनिक कंपन्यांचे महत्व अधिकच वाढले असून, या कंपन्यांनी आपली 90 टक्के क्षमतेने उत्पादन सुरु केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

जावडेकर म्हणाले, देशभरात 249 केंद्रीय सार्वजनिक आस्थापना कार्यरत असून त्यांची वार्षिक उलाढाल, 25 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच त्यांचा निव्वळ नफा, 1.75 लाख कोटी इतका आहे, त्यांचे लाभांश, व्याज, कर आणि जीएसटी या सगळ्या मार्फत या कंपन्या 3.62 लाख कोटी रुपये अदा करतात आणि दरवर्षी कॉपोर्रेट सामाजिक जबाबदारीच्या रूपाने साडेतीन हजार कोटी रुपये सामाजिक कार्यांसाठी खर्च करत असतात.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*