वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचा लेटरबॉम्ब शनिवारी पडला आणि या पत्रामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारवरच प्रश्नचिन्ह ठपका पडला. Prakash ambedkar comes down heavily on Thackeray – pawar govt over anil deshmukh 100 cr extortion issue
त्याचसंदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे – पवार राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त करण्याची मागणी आम्ही राज्यपालांना करणार आहोत”, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर राज्यपालांची भेट घेणार!
आपण सोमवारी दुपारी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात राजकारणी आणि प्रशासनातले गुन्हेगारी घटक एकत्र येऊन काय काय करू शकतात, हे आपण पाहातो आहोत. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी १०० कोटी कसे वसूल करायला सांगितले हे स्पष्ट केले आहे. हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे. पण हे नेक्सस उभे राहिले आहे. २२ तारखेला सोमवारी १२.१५ वाजता राज्यपालांनी आम्हाला वेळ दिली आहे. आम्ही भेटून आमची बाजू मांडणार आहोत. तसेच, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे हे दिसत आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना मुंबईतल्या पब आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. तसेच इतर मार्गांनी देखील जमा करण्यात येणारी रक्कम मिळून महिन्याला १०० कोटींचे टार्गेट देण्यात आले होते, असे परमवीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.