यवतमाळमध्ये गर्भपात करण्यात आलेली पूजा राठोड म्हणजे पूजा चव्हाण, धागेदोरे जुळू लागले

वनमंत्री संजय राठोड यांच्या काळ्या कृत्यांना झाकण्याचा कितीही प्रयत्न उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार करत असले तरी पूजा चव्हाणच्या मृत्यूमागचे संदर्भ उघड होऊ लागले आहेत. यवतमाळमध्ये नेऊन बळजबरीने गर्भपात करण्यात आलेली ‘पूजा राठोड’ हीच ‘पूजा चव्हाण’ असल्याचे आता पुढे आले आहे. ‘Pooja Rathod’, who was aborted in Yavatmal, is ‘Pooja Chavan’


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे धागेदोरे यवतमाळमध्ये गर्भपात झालेल्या पूजा राठोड नामक तरुणीशी जुळत आहेत. त्यामुळे पूजा राठोड म्हणजेच पूजा चव्हाण असल्याचे धागेदोरे जुळू लागले आहेत.

यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी पूजा अरुण राठोड या नावाने शिवाजीनगर, नांदेड, येथील एक २२ वर्षीय तरुणी दाखल झाल्याची नोंद आहे. या तरुणीवर अर्धवट अवस्थेतील गर्भपातासंदर्भात उपचार केल्याचे नोंदवले आहे.रुग्णालयातील महिला व प्रसूती कक्ष क्रमांक तीनमध्ये ही तरुणी दाखल होती. सहायक प्राध्यापक तथा युनिट प्रमुख डॉ. श्रीकांत वराडे यांच्या देखरेखीत या तरुणीवर उपचार झाल्याची नोंद आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कथित ध्वनिफितींमुळे चर्चेत आलेल्या तरुणाचे नाव अरुण राठोड आहे. योगायोगाने ६ फेब्रुवारीला येथे गर्भपातासंदर्भात उपचार झालेल्या तरुणीचे नावही पूजा अरुण राठोड असे नोंदवले आहे. मात्र हीच तरुणी पूजा चव्हाण होती का, याबाबत वानवाडी पोलिसांचा तपास अद्यापही पुढे सरकलेला नाही.

या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी वानवाडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांच्या नेतृत्वात १५ फेब्रुवारी रोजी तपास पथक यवतमाळात आले होते. वानवाडी पोलिसांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून काही माहिती घेतली. यासंदर्भात गोपनीय अहवाल पुणे पोलीस घेऊन गेलेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कांबळे यांनी एका दैनिकाला दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री व प्रसूतिरोगतज्ज्ञ स्वत: एका तरुणीस पहाटे रुग्णालयात घेऊन येतात, तिला स्वत: दाखल करतात, तिच्यावर शल्यगृहात स्वत: उपचार करतात. ते वॉर्डात ड्युटीवर असलेल्या अधिपरिचारिका किंवा परिचारिकेची मदत घेत नाहीत. युनिट दोनच्या प्रमुखांची ड्युटी असताना युनिट एकचे प्रमुख तथा विभाग प्रमुख रुग्णास परस्पर पहाटे उपचारासाठी घेऊन येतात, हा सर्व घटनाक्रमच संशयास्पद आहे. मात्र या दृष्टीने पोलिसांनी तपासच केला नसल्याचा आरोप यवतमाळच्या भाजप महिला आघाडी प्रमुख माया शेरे यांनी केला. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

वैद्यकीय महाविद्यालयात दीडशेवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. वानवाडी पोलिसांनी या सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणाच्या तपासणीची नोंद केली नाही. पोलिसांनी सीसीटीव्हीमधील चित्रीकरण पाहिले असते तर प्रकरणातील सत्य केव्हाच बाहेर आले असते, अशी प्रतिक्रिया यवतमाळच्या भाजप महिला आघाडी प्रमुख माया शेरे यांनी दिली. आतापर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरणातील पुरावा नष्ट करण्यात आला असावा, असेही शेरे म्हणाल्या.

पहाटे दाखल झाल्यानंतर ही तरुणी ६ फेब्रुवारीलाच दुपारी साडेबारा वाजता स्वमर्जीने सुटी घेऊन अरुणसह निघून गेल्याचे वैद्यकीय महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र ही तरुणी यवतमाळातून कोणासोबत, कोणत्या वाहनाने गेली, या दृष्टीनेही तपास झाला नाही. रविवारी पुणे येथे पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर हा घटनाक्रम पोलिसांच्या तपासाची मुख्य दिशा असायला हवा होता, मात्र अद्यापही पोलिसांना तपासाची दिशा गवसली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुणे पोलीस यवतमाळमध्ये चौकशी करून १० दिवस लोटले, तरीही पूजा अरुण राठोड हीच पूजा लहू चव्हाण आहे का, या तरुणीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचा जबाब पुणे पोलिसांनी का घेतला नाही, या तरुणीस महाविद्यालयात दाखल करताना नोंदवलेल्या नांदेड येथील पत्त्यावर पोलिसांनी तपास केला काय, असा सवाल केला जात आहे.

‘Pooja Rathod’, who was aborted in Yavatmal, is ‘Pooja Chavan’

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*