पोलीसांच्या उलट-सुलट प्रश्नांमुळे बलात्कार पीडितेची आत्महत्या, नालासोपाऱ्यातील प्रकार

पोलीसांनी बलात्कार पीडितेला उलट सुलट प्रश्न विचारल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. पोलीसांच्या प्रश्नांमुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलीसांनी बलात्कार पीडितेला उलट सुलट प्रश्न विचारल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. पोलीसांच्या प्रश्नांमुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, मुंबईतील नालासोपारा येथे एक बलात्कार पीडित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांमुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा पीडितेच्या आईचा आरोप आहे. तपास करणारे पोलिस तिला बलात्काराबद्दल उलट-सुलट प्रश्न विचारत होते. यामुळे ती हतबल झाली, असे आईचे म्हणणे आहे.

19 सप्टेंबर रोजी पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दोन दिवसांनंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. आरोपीने लग्नाचे आमिष देऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केला होता. रविवारी झालेल्या मुलीच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबांनी पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला आणि यास जबाबदार पोलिस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली. यादरम्यान त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन देखील केले.

पीडितेच्या आईने केलेल्या आरोपांनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. एसपी पातळीवरील उप-अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील. तपासात कोणी पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*