पंतप्रधान आज करणार वैभव परिषदेचे उद्घाटन

विशेष प्रतिनीधी 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (2 ऑक्टोबर) संध्याकाळी 6:30 वाजता वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत. भारतीय वंशजाच्या दिग्गज शास्त्रज्ञांना या माध्यमातून एकत्र आणले जाणार आहे.

 

वैभव परिषद ही परदेशी आणि निवासी भारतीय संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांची आभासी परिषद आहे. जागतिक स्तरावरील विकासासाठी शैक्षणिक आणि संशोधन तसेच तंत्रज्ञान आधार मजबूत करण्यासाठी सहयोग यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन व विकास संस्थांमध्ये भारतीय वंशाच्या दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.

 

उद्घाटनांनंतर ऑनलाईन चर्चासत्रे होणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या परिषदेत 55 देशांतील 3 हजार भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ, 10 हजार निवासी शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ परिषदेत वेबिनार, व्हिडीओ कॉन्फरन्स या माध्यमांतून विविध पातळ्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पूर्ण ऑक्टोबर महिना चालणाऱ्या परिषदेचे आयोजन करत आहे.

 

40 पेक्षा अधिक देशांचे दीड हजार पॅनेलिस्ट, 200 आघाडीच्या भारतीय संशोधन आणि विकास आणि शैक्षणिक संस्था 18 विविध क्षेत्रांवर आधारीत 80 विषयांवरील 200 चर्चासत्रांमध्ये आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. समारोपाचे सत्र सरदार पटेल जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*