चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहला भेट देऊन आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहला भेट देऊन आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लडाखमधील लेहला भेट दिली. निमू येथे त्यांनी लष्कर, हवाई दल आणि कळइढ च्या जवानांशी संवाद साधला. जवानांची विचारपूस करत त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला.
या भेटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींबरोबर चर्चा केली. चीनी व्हायरसच्या संकटाची सध्याची स्थिती आणि केंद्र सरकारतर्फे त्यावर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्याचबरोबर देशाच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती आणि भारताची विविध देशांशी मागील काही दिवसांत झालेली चर्चा या संदर्भात पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात चर्चा झाली.
चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव, पाकिस्तानच्या तसेच नेपाळमधील ओली सरकारच्या भारतविरोधी कारवाया या संदर्भात पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना माहिती दिली. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपायांबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आणि भारतीय सैन्य दलांचे घटनात्मक सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली.