पवारांचे मोदीस्तुतीचे भाजपला “गाजर”; काँग्रेसच्या जखमेवर झोंबरे “मीठ”


  • पवार म्हणतात, “मोदीही नेहरूंसारखेच वागले, सीमेवर जाण्याचा निर्णय योग्यच”

विशेष प्रतिनिधी

पुणे : भारत – चीन संघर्षाच्या निमित्ताने शरद पवार दुटप्पी रणनीती पत्रकार परिषदेत उघड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करून त्यांनी भाजपला “खुशीचे गाजर” दाखविले, त्याच वेळी मोदींची तुलना पं. नेहरूंशी करून काँग्रेसच्या विशेषत: राहुल गांधींच्या जखमेवर मीठ चोळले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लेह येथील लष्करी तळावर जाऊन सैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय योग्यच होता, असे प्रतिपादन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केले. त्याच वेळी त्यांनी १९६२ साली युद्धात आपला पराभव झाला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हेदेखील प्रत्यक्ष सीमारेषेवर LAC गेले होते, याची आठवण करून दिली. नेहरू – चव्हाणांनी भारतीय सैनिकांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. मोदींनी तेच केले. जेव्हा अशाप्रकारचा प्रसंग उद्भवतो तेव्हा देशाच्या नेतृत्त्वाने सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पावले उचललीच पाहिजेत, असे पवारांनी सांगितले.

राहुल गांधी रोज काही ना काही प्रश्न विचारून मोदींना आणि केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असताना पवारांनी मोदींची स्तुती करून काँग्रेसजनांच्या जखमेवर एक प्रकारे मीठच चोळले आहे. असे करण्याची पवारांची ही दुसरी वेळ. त्यातही कहर म्हणजे त्यांनी मोदींची तुलना थेट नेहरूंशी केल्याने भाजपला “खुशीचे गाजर” गोड लागले. पण काँग्रेसजनांना जखमेवर चोळलेले मीठ चांगलेच झोंबले.

यापूर्वीही शरद पवार यांनी मोदी सरकारची पाठराखण केली होती. गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक निशस्त्र का गेले, हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आक्षेप शरद पवार यांनी सर्वपक्षीय बैठकीत खोडून काढला होता. भारताला आंतरराष्ट्रीय कराराचे पालन करावे लागत असल्याचे पवार यांनी म्हटले होते. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही. लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही.

मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौरस किलोमीटरचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार झाला पाहिजे, असेही शरद पवार यांनी म्हटले होते. यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी मोदींच्या कृतीचे समर्थन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती