शादी डॉट कॉम… याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना टोला

  • सुक्या धमक्या देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती का?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपाचे आमदार नितेश राणे आणि युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सचिन वाझे यांना अंबानी स्फोटक प्रकरणात अटक झाल्यानंतर नितेश राणे यांनी वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्या संबंध असल्याचा आरोप केला. त्या आरोपाला उत्तर देताना सरदेसाई यांनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत टीका केली होती. तसेच आपण सुसंस्कृत घरातून असल्याचेही म्हटले होते. त्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सरदेसाई यांचा व्हिडीओ ट्विट करत लग्नासाठी पत्रकार परिषद घेतल्याचा टोला लगावला आहे. Nitesh Rane takes on varun sardesai again

सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांचे संबंध होते. दोघांच्या मोबाईलवरील संभाषणाची एनआयएने चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याला उत्तर देताना युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी स्वतःची शैक्षणिक व कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली होती. त्यावरून आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.“डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्याने आपली आणि कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा,” असा टोला लगावला आहे.

ट्विटबरोबरच पत्रकार परिषदेतूनही राणे यांनी वरूण सरदेसाईंवर टीका केली होती. लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? असे राणे म्हणाले. “सचिन वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढले नाही. मी बोललो ते खरे की खोटे, याबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का?,” असेही ते म्हणाले.

  • आम्हाला शिवसेनेची अंडीपिल्ली माहितीये

सरदेसाई यांच्या न्यायालयात खेचण्याच्या इशाऱ्याला उत्तर देताना आपणही शिवसेनेची प्रकरणे बाहेर काढू, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. “आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणे बाहेर काढायची का? ही माहिती बाहेर आली, तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही,” असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

Nitesh Rane takes on varun sardesai again

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*