विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींच्या बातम्यांमधून महाराष्ट्रात काँग्रेस उपमुख्यमंत्रीपद मागणार असल्याच्या नुसत्या बातम्या आल्या… तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांचे कान उभे राहिले. खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांनी अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईत त्यांचा इन्कार करून बातम्यांचा “झटका” नेमका कोणाला बसला, हेच अप्रत्यक्षपणे सूचित करून बसले.NCP leadership fears congress may consolidate its footprints in maharashtra by demanding DyCM post
वास्तविक काँग्रेस काही अजित पवारांचे किंवा राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्रीपद काढून घेऊन ते पद मागणार नाही, तर जादाचे एक उपमुख्यमंत्रीपद मागेल, अशा त्या बातम्या आल्यात. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला नुसत्या बातम्याही सहन होईनाशा झाल्याचे त्यांच्या उत्तरांमधून दिसून आले.
काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद नाना पटोलेंना मिळाले तर त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद सोडावे लागेल. त्यावेळी ते पद शिवसेनेला देऊन जादाचे उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस घेईल, अशी चर्चा दिल्ली आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात फिरली.
ती फिरल्यावर पत्रकारांनी संजय राऊत आणि अजित पवारांना गाठून तो प्रश्न विचारला तेव्हा त्यावर दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या वेळी समान उत्तर दिले. अशा बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे ते उत्तर होते. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात तसे ठरले नसल्याचे अजित पवार म्हणाले.
पण त्यांच्या उत्तरांमधून त्यांची अस्वस्थताच एक प्रकारे बाहेर आली. काँग्रेसला जादाचे उपमुख्यमंत्रीपद देणे म्हणजे अधिकारपदांची वाटणी करणे, यातून शिवसेनेचा जास्त तोटा होणार नाही. कारण मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यांना योग्य राजकीय अंतरावर ठेवण्यात यश मिळविले आहे… पण प्रश्न आहे, तो राष्ट्रवादीचा.
काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले तर काँग्रेसचे नेते एकदम अजितदादांच्या बरोबरीला येतील. आत्तापर्यंत काँग्रेसला महाविकास आघाडीत जे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे, ते दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजे राष्ट्रवादीच्या बरोबरीचे होईल. ग्रामीण भागात राष्ट्रवादीसाठी ते अडचणीचे ठरेल. म्हणून त्याला शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीचा विरोध असणार आहे.
राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच अर्थमंत्रीपदही आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी पुरेसा मिळत नसल्याची आधीच तक्रार आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद दिले, तर त्या तक्रारीची राजकीय धार वाढून निधी जास्त द्यावा लागेल.
आणि मग तो मागेही घेता येणार नाही. यातून काँग्रेसचा प्रभाव मंत्रिमंडळात वाढेल. आणि त्याचा त्रास शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला होईल, ही भीतीयुक्त शंकाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला सतावते आहे… म्हणून काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची नुसती बातमी येताच क्षणी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांचे कान उभे राहिले आहेत.