डान्सबार बंदीकार आबा ते बार वसुलीकार देशमुख व्हाया तेलगीफेम भुजबळ; पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यातील गृह मंत्रालयाची “पुरोगामी” वाटचाल!!

विनायक ढेरे

मुंबई – परमवीर सिंग लेटरबाँम्बच्या निमित्ताने गृहमंत्री अनिल देशमुख यांची राजकीय अब्रू चव्हाट्यावर आलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे गृह मंत्रालय यांच्यातील “अन्योन्य संबंधां”चीही चर्चा सुरू झाली आहे. NCP home ministers from r. r. patil to anil deshmukh, matters of corruptions

१९९९ मध्ये स्थापना झाल्यापासून फक्त पाचच वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या राष्ट्रवादीच्या ताब्यात उर्वरित काळात महाराष्ट्राचे गृह मंत्रालय होते. शरद पवारांच्या “दमदार” प्रतिमावर्धनात त्या गृह मंत्रालयाचा मोठा वाटा राहिलेला आहे. या गृह मंत्रालयात काम करण्याची पवारांनी अनेक नेत्यांना संधी दिली… पण पवारांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यातील महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाची वाटचाल… डान्सबार बंदीकार आर. आर. आबा ते बार वसुलीकार अनिल देशमुख व्हाया तेलगीफेम छगन भुजबळ, अशी “उज्ज्वल आणि पुरोगामी” राहिलेली दिसते.



तशी पवारांनी महाराष्ट्राचे गृह मंत्रालय चालविण्याची संधी जयंत पाटील, अजित पवारांनाही काही काळ दिली. अखंड काँग्रेस असताना ती संधी शिकार – घोडसवारी फेम पद्मसिंह पाटलांनाही दिली, पण राष्ट्रवादीच्या काळात आर. आर. पाटील उर्फ आबा, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांनी जेवढे गृह मंत्रालय “गाजवून” सोडले, तेवढे कुणालाही जमलेले नाही… खुद्द पवारांनाही ते गृह राज्यमंत्री असतानाही… (अर्थात पवारांनी गृह राज्यमंत्री असताना काही स्लॅब ठरवून दिल्याची चर्चा होती… पण तेव्हाच्या मीडियाने ती फारशी उचलून धरली नव्हती.)

पण महाराष्ट्राचे गृह मंत्रालय “गाजविले” ते आर. आर. आबांनी… डान्सबार बंदी आणून. त्यावेळी आबांचे खूप कौतूक झाले होते. आबा कसे कणखर गृहमंत्री आहेत… त्यांनी कसे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला शिस्तीत आणले वगैरे सुरस आणि चमत्कारी कहाण्या मराठी माध्यमे त्या काळात चवीने छापत असत. मराठी माध्यमांच्या एका सेक्शनने आबांना त्यावेळी फार उचलून धरले होते… पण त्यावेळी देखील डान्सबार बंदीवरच्या चर्चेला एक किनार होती, ती म्हणजे समाजातल्या एका सधन विशिष्ट वर्गाचे, विशेषतः तरूण मुलांचे नुकसान होतेय याची… महाराष्ट्राच्या विशिष्ट भागात गुंठेवारीत ही मुले पैसे मिळवतात आणि पनवेलच्या डान्सबारमध्ये जाऊन उडवतात. त्यातून व्यसनाधीनता, ड्रग्ज पेडलिंग, बेटिंग वगैरे प्रकारांमुळे मोठे नुकसान झाल्याची विशिष्ट वर्गात अंतर्गत चर्चा होती… त्याचा परिणाम म्हणून डान्सबार बंदी लादण्यात आली… अगदी डान्सबार चालकांकडून देवाण – घेवाण होऊन सुद्धा ही बंदी लादली गेली. त्याचे “श्रेय” आर. आर. आबांना मिळाले.

जयंत पाटलांची मध्यम आणि अजित पवारांची छोटी गृह मंत्रीपदाची कारकीर्द सनसनाटी बातम्यांविना गेली… याचा अर्थ तिथे काही “घडत” नव्हते, असे नव्हे… पण बाहेर काही आले नाही किंवा आणले गेले नाही एवढे खरे.

छगन भुजबळांची गृह मंत्रीपदाची कारकीर्द गाजली ती तेलगी – स्टँम्प घोटाळा प्रकरणाने… त्यातून बनावट नोटांचे प्रकरण बाहेर आले. त्याचे किती कोटी होते याची तर अजूनही गिनतीच बाहेर आलेली नाही. गोदावरीच्या पात्रातून बरेच पाणी वाहून गेले तरी… पण तेलगीची नार्को टेस्ट झाली. त्यात छगन भुजबळांचे त्याने नाव घेतले. शरद पवारांचे नाव घेतले. त्यावेळी तात्पुरता राजकीय बळी भुजबळांचा घेतला गेला.

आता अनिल देशमुखांचा नंबर लागतोय… त्यांच्या काळात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने “विक्रम”च गाठलाय… सेवेतल्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्र्यावरच महिन्याला १०० कोटीं रूपयांच्या खंडणीखोरीचा आरोप केलाय… तो देखील पत्र लिहून… हा “विक्रम” पवारांची राष्ट्रवादी सोडून देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला करता आलेला नाही. त्याची राजकीय परिणीती थोड्याच वेळात समोर येईल… अनिल देशमुखांना राजीनामाही देण्यास भाग पाडले जाईल… पण त्यातून मूळात पवारांना स्वतःची जबाबदारी झटकता येईल का…?? हा १०० कोटींहून अधिक मोलाचा सवाल आहे.

पवार आणि राष्ट्रवादी हे आपण पुरोगामी असल्याचे सांगत असतात… महिला धोरण, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुधारणा केल्याचे श्रेय घेत असतात… पण त्याच पवारांच्या ताब्यात सुमारे २० वर्षे राहिलेल्या महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाची वाटचाल मात्र… डान्सबार बंदीकार आर. आर. आबा ते बार वसुलीकार अनिल देशमुख व्हाया तेलगीफेम भुजबळ; अशी “उज्ज्वल आणि पुरोगामी” राहिली असल्याची वस्तुस्थिती आहे…!! त्याकडे पवार समर्थक पत्रकार दुर्लक्ष करू देत… पण महाराष्ट्र कसा दुर्लक्ष करेल…!!!

NCP home ministers from r. r. patil to anil deshmukh, matters of corruptions

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*