नानांच्या निमित्ताने काँग्रेसने टाकला पेच; ठाकरे – पवार सरकारला मारलीय पाठिंब्याच्या किंमत वसूलीची मेख

विनायक ढेरे

मुंबई : काँग्रेसने नाना पटोले यांना विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लावून टाकलाय पेच, ठाकरे – पवार सरकारला मारलीय पाठिंब्याच्या किंमत वसूलीची मेख असेच सध्याच्या राजकीय घडामोडींचे वर्णन करावे लागेल. ठाकरे – पवार सरकारला दिलेल्या पाठिंब्याची किंमत वसूल करण्याच्या मूडमध्ये सध्या काँग्रेसचे नेतृत्व दिसते आहे.nana patole resignation creates rukles in thackeray – pawar govt

महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार स्थिर होत असतानाच विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, अशी परिस्थिती नानांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झाली आहे. आणि तीच नेमकी मेख काँग्रेसने ठाकरे – पवार सरकारला मारून ठेवली आहे. आणि ते बरोबरच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार “सगळे मॅनेज” करू शकतात असे गृहीत धरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला संपूर्ण वर्षभर बरेच गृहीत धरले. त्यांच्या मंत्र्यांना तिय्यम दर्जाची वागणूक दिली. काँग्रेसचा पाठिंबा तर हवा, पण त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यांना पुरेसा निधी दिला नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार दिले नाहीत.काँग्रेसच्या मंत्र्यांची ही कुचंबणा ठाकरे आणि पवार या दोघांनीही केली. आता काँग्रेस आपल्या पाठिंब्याची किंमत वसूल करायची राजकीय पावले टाकत आहे. नानांचा राजीनामा हे त्याचे पहिले पाऊल आहे. आता विधानसभेचे अध्यक्षपद नाही, तर उपमुख्यमंत्रीपदाची मागणी पुढे केली आहे.

त्यावर दिल्लीत शरद पवारांनी विधानसभेचे अध्यक्षपद तीनही पक्षांसाठी खुले असल्याचे विधान करून आपले पत्ते टायमिंगच्या आधीच खोलून ठेवले आहेत. काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचे नाव पुढे येणे पवारांना नको आहे. अर्थात काँग्रेसने त्यावर नेहमीप्रमाणे भाष्य केलेले नाही. पण केवळ पवारांना नकोत म्हणून आता काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण डावलण्यात येण्याची शक्यता फार कमी आहे. कारण मूळात चव्हाण हेच काँग्रेसचा विधानसभा अध्यक्षपदासाठी पहिला चॉइस होते. पण त्यावेळी महाविकास आघाडी बनत असतानाच त्यात खोडा नको म्हणून काँग्रेसश्रेष्ठींनी पवारांचे म्हणणे ऐकले. पण ठाकरे – पवार सरकारला वर्ष झाल्यानंतर ते पुन्हा पवारांचे ऐकतील, याची गॅरंटी नाही.

किंबहुना पवार म्हणतील त्याच्या उलटच काँग्रेस निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीतील पवारांचा राजकीय वट्ट कमी करण्याची संधी काँग्रेस नेते शोधत आहेत. कदाचित त्याला शिवसेना नेतृत्त्वाचीही छुपी साथ मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण त्यातून महाविकास आघाडी सरकार शरद पवार चालवतात हा राजकीय समज दूर करण्याची शिवसेना नेतृत्त्वाला आणि काँग्रेस नेतृत्त्वाला एकत्र संधी मिळण्याची शक्यता आसल्याचे बोलले जात आहे.

अर्थात हा अंदाज आहे, आणि तो काँग्रेस – पवार यांच्यातील राजकीय संबंधांच्या इतिहासावर आधारलेला आहे. एका विशिष्ट मर्यादेपलिकडे काँग्रेसने पवारांचे महत्त्व कधीही महाराष्ट्रात आणि देशात वाढू दिलेले नाही. हा इतिहास आणि वर्तमानही आहे. नानांनी विधानसभेचे अध्यक्षपद सोडल्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये कदाचित तसेच घडण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेचे अध्यक्षपद तीनही पक्षांना खुले असल्याचे बोलून पवार आपले पत्ते खोलून बसले आहेत. पवारांनी हा टायमिंगचा श़ॉट तर मारला आहे… पण काँग्रेस नेतृत्वासाठी तो नेहमीप्रमाणे झेल ठरण्याची दाट शक्यता आहे.

nana patole resignation creates rukles in thackeray – pawar govt

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*