ही बातमी between the lines वाचावी; मुंबई पोलीस दल कठीण परिस्थितीतून जातेय, मी प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करेन – मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “मुंबईचे पोलीस दल सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. मी प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन. सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी कायद्याप्रमाणे आपली कर्तव्ये पार पाडावीत अशा सूचना देण्यात येणार आहेत…”, ही विधाने आहेत, मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची. Mumbai new CP Haemant Nagrale says, Mumbai Police is undergoing turmoil due to some bad instances that have occurred

सगळ्यांच्या मदतीने बदल घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नेमणूक केली आहे, असे विधानही नगराळे यांनी केले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन. त्यासाठी मला सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कॉन्स्टेबल यांचे सहकार्य मिळेल, अशी मला अपेक्षा आहे, अशी विधाने देखील हेमंत नगराळे यांनी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत केली आहेत.

पोलीस अधिकाऱ्याचा गुन्ह्यांमध्ये सहभाग ही पोलीस दलाला शोभणारी गोष्ट नाही. सध्या जो तपास सुरू आहे, त्यावर मी भाष्य करणार नाही. पण सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना देण्यात येतील, असे नगराळे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई पोलीसांची गमावलेली प्रतिमा आणि गौरव आम्ही पुन्हा प्राप्त करू, असे महत्त्वाचे विधान नगराळे यांनी केले आहे.

  • पण हेमंत नगराळे यांनी खालील मुद्द्यांची उत्तरे दिलेली नाहीत…
  • मुंबई पोलीसांची प्रतिमा केव्हा बिघडली? ती बिघडून किती दिवस झाले? ती नेमकी कशामुळे आणि कोणामुळे बिघडली?
  • पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत… मग आत्तापर्यंत ते कशानुसार आपली कर्तव्ये पार पाडत होते? त्यांना नेमके कोण सूचना देत होते??
  • पोलीसांची प्रतिमा सुधारण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कॉन्स्टेबल यांचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा हेमंत नगराळे यांनी व्यक्त केली आहे… मग आत्तापर्यंत असे सहकार्य मिळत नव्हते का?… कोण सहकार्य करीत नव्हते? त्यामुळे नेमके काय झाले??
  • वरील प्रश्न एक तर हेमंत नगराळे यांना विचारले गेले नाहीत. किंवा त्यांनी त्याची उत्तरे अद्याप दिलेली नाहीत… कदाचित हा त्यांच्या प्रतिमासुधाराचाच एक भाग असावा, असा कयास करण्यास हरकत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*