विशेष प्रतिनिधी
पुणे : पक्ष स्थापन करताच पुणे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आणणाऱ्या मनसे संघटनेत राज ठाकरे नवी जान फुंकत आहेत. त्यासाठी राज यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना एकला चलो रे चा कानमंत्र दिला आहे.MNS cheif raj thackeray hold meeting in pune, insists on party organizational expansion expa
राज्यातील महापालिकांच्या निवडणूका जवळ आल्यानंतर सगळ्याच पक्षांनी कात टाकायला सुरूवात केल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे देखील तितकेच अँक्टिव्ह झालेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही त्यांनी लक्ष घालायला सुरूवात करून सगळ्या पक्ष कार्यकर्त्यांना एकला चलो रे चा मंत्र देऊन पक्षाचा जुना जनाधार मिळवायला प्रोत्साहन दिले आहे.
कल्याण – डोंबिवलीत पक्षाची पडझड होताच राज यांनी ताबडतोब डॅमेज कंट्रोल करत तिथे नवे नेतृत्व देऊन कामाला सुरूवात देखील करायला सांगितली. तशीच त्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष संघटनेत नवी जान फुंकण्याचा प्रयत्न केला आहे.
राज यांनी पुण्यातील राजमहल या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पक्षविस्ताराचा कानमंत्र दिला. पक्षाने हिंदुत्वाची भूमिका घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची रणनीती ठरविली आहे. यातून शहरी भागांमध्ये पक्षाचा विस्तार करण्याचा राज यांचा मनसूबा आहे. महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांचाही समावेश करावा, अशी गळ पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घातली आहे.
मनसेचे बळ दखल घेण्याजोगे
सध्या मनसेचे केवळ 2 नगरसेवक पुणे महापालिकेत आहेत. 2012 साली मनसेचे तब्बल 29 नगरसेवक होते. तेव्हा मनसे पुण्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. अर्थात मनसे एकट्याने लढणार की? भाजपाशी युती करून मैदानात उतरणार हे गुलदस्त्यात आहे. पण सध्या तरी कामाला लागा एवढाच संदेश त्यांनी दिला आहे. मनसेचा वर्धापन दिन पुढच्या महिन्यात आहे. त्याच दिवशी राज ठाकरे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकतील अशी अटकळ आहे.