मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा इशारा

मराठा समाजाच्या मागण्या 9 ऑक्टोबर पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 10 तारखेला कडकडीत महाराष्ट्र बंद करणार आहे. मंत्र्यांना महाराष्ट्र फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीने दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्या 9 ऑक्टोबरपर्यंत मान्य केल्या नाही तर 10 तारखेला कडकडीत महाराष्ट्र बंद करणार आहे. मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीने दिला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली. मराठा मुलांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी 10 तारखेला महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. तसेच जे 10 टक्के राज्य सरकारने आरक्षण देऊ केलं ते सुरू तरी करा अशी मागणीही या समितीनं केली आहे. वेगवेगळी आंदोलनं, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत बैठका, मुकमोर्चा, 42 जण हुतात्मा एवढे सगळे झाले तरी सरकारला जाग आली नाही. त्यामुळे आता सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर राज्यात कोणताही मंत्री कोणत्याही गावात फिरकू देणार नाही असा इशाराही या समितीनं दिला आहे.

10 तारखेचा बंद म्हणजे महामार्ग जाम करणार, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवणार आहे, भाज्या दूध-ट्रक अडवणार, बस एसटी फिरू देणार नाही, आमदार आणि खासदारांना घेराव घालणार असल्याचंही या समितीनं म्हटलं आहे. तसेच अजून वेळ गेलेली नाही. मागच्या सरकारमध्ये ठोक मोर्चे सुरू झाले, नुकसान झालं, जाळपोळ झाली. पण या सरकारला आवाहन समजत नसेल तर या सरकारलाही तशाच पद्धतीने समजवावं लागेल.10 तारखेला बंद आहे त्याची जबाबदारी ही सरकारचीच राहील.

मराठा युवकांच्या भावनांवर आज आम्ही ही मागणी करत आहोत. समाजाची माणसं जरी वेगवेगळ्या पक्षाची असतील तरी समाजासाठी सगळे एकत्र येतील असंही या समितीनं म्हटलं आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समिती काम करत असल्याचंही समितीतील सदस्यांनी म्हटलं आहे. या समितीनं 23 तारखेला गोलमेज परिषद आयोजित केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*