मंत्र्यांना वीजबिलात सवलत, अन् अधिकाऱ्यांना शिक्षा, हसन मुश्रीफ यांचे अजब तर्कट

मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता अजब तर्कट मांडले आहे. राज्य शासनाची नाहक बदनामी होत आहे. याप्रकरणी बेस्ट वीज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन, त्यांच्याकडून थकीत कालावधीतील रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता अजब तर्कट मांडले आहे. राज्य शासनाची नाहक बदनामी होत आहे. याप्रकरणी बेस्ट वीज कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन, त्यांच्याकडून थकीत कालावधीतील रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी आपण करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

सामान्य ग्राहकांना अवाच्या सवा वीजबिले पाठविणाऱ्या बेस्ट वीज कंपनीने लॉकडाऊनच्या काळात मंत्र्यांना मात्र बिलेच पाठविली नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी समोर आणली होती. सर्वसामान्य ग्राहक वीज बिलाने त्रासलेला आहे.

नोकऱ्या नाही. कंपन्या बंद होत आहे. त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचना त्यांच्या समोर आहेत. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुश्रीफ म्हणाले, सर्वच मंत्र्यांच्या बंगल्यांची देयके सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरली जातात. मुंबईमध्ये बेस्ट या कंपनीकडून वीज पुरवठा केला जातो, मात्र थकीत कालावधीतील देयके बेस्ट कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळाली नसल्याचे समजते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन देयके जमा करणे अपेक्षित होते. याबाबत माझे इतर मंत्र्यांशी बोलणे झाले नाही. अशा विषयांवरून सरकारची बदनामी होता कामा नये असे काम अधिकाऱ्यांनी करावे. व्याजाची रक्कम त्यांनी जमा न केल्यास आपण देणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*