मध्यस्थ, दलालांची व्यवस्था नसल्यानेच कृषी विधेयकाला विरोध, पंतप्रधानांचा घणाघात

ज्यांनी सातत्याने आपल्या राजकीय स्वार्थाचा विचार करून काम केले, त्यांना कृषी सुधारणा अस्वस्थ करीत आहेत. त्यांनी तयार केलेली मध्यस्थ आणि दलालीची व्यवस्था आता असणार नाही, त्यामुळे हे अस्वस्थ लोक भ्रम निर्माण करीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ज्यांनी सातत्याने आपल्या राजकीय स्वार्थाचा विचार करून काम केले, त्यांना कृषी सुधारणा अस्वस्थ करीत आहेत. त्यांनी तयार केलेली मध्यस्थ आणि दलालीची व्यवस्था आता असणार नाही, त्यामुळे हे अस्वस्थ लोक भ्रम निर्माण करीत आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.

हिमाचल प्रदेशातल्या सिरसू येथे झालेल्या आभार समारंभात पंतप्रधान बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, कुल्लू, सिमला किंवा किन्नूर येथे पिकणाऱ्या सफरचंदांची किंमत शेतकरी बांधवांना 40ते 50 रुपये प्रतिकिलो मिळते. मात्र अखेरच्या वापरकर्त्याला हीच सफरचंदे 100 ते 150 रुपये किलो दराने खरेदी करावी लागतात. यामध्ये शेतकऱ्याला फारसे काही मिळत नाही की ग्राहकालाही फार लाभ होत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी सफरचंदाचा हंगाम अगदी बहरामध्ये असतो, त्यावेळी बाजारपेठेत आवक प्रचंड प्रमाणावर होत असल्यामुळे फळांचे भावही कोसळतात. त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी बांधवांना बसतो.

आता कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कायद्यामध्ये ऐतिहासिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान प्रमाणावर शेती करणारे उत्पादक आपली संघटना तयार करून देशामध्ये कोठेही आणि कुणालाही आपल्या सफरचंदांची विक्री करण्यास मुक्त असणार आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे सांगून नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत देशातल्या सुमारे 10.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एक लाख कोटी रुपए जमा केले आहेत, अशी माहिती दिली. यामध्ये हिमाचल प्रदेशातल्या 9 लाख शेतकरी कुटुंबांचा समावेश असून त्यांच्या खात्यात एक हजार कोटी रुपये जमा केले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि स्वावलंबी- आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी सुधारणांची प्रक्रिया आता अशीच सुरू राहणार आहे. आपल्याकडे अनेक क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्याची संधी देण्याची परवानगी नव्हती. परंतु नव्याने लागू करण्यात आलेल्या कामगार सुधारणांमध्ये महिलांना सर्व क्षेत्रात कामाच्या समान संधी उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांना पुरूष कामगारांइतकेच समान वेतन देण्यात येणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*