मथुरेतील लढ्याचा निर्णय घेण्यासाठी १५ ऑक्टोबरला बैठक

भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेतील इदगाह मशीद हटवण्याच्या कायदेशीर लढाईत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी धर्मगुरूंची एक बैठक वृंदावन येथे १५ ऑक्टोबरला होणार आहे.


विशेष प्रतिनिधी

मथुरा : भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या मथुरेतील इदगाह मशीद हटवण्याच्या कायदेशीर लढाईत सामील व्हायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी धर्मगुरूंची एक बैठक वृंदावन येथे १५ ऑक्टोबरला होणार आहे.

श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी असलेली सतराव्या शतकातील इदगाह मशीद हटवण्यासाठी मथुरा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंदिराची १३ एकर जागा ही कटरा केशव देव मंदिराच्या मालकीची आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश छाया शर्मा यांच्याकडे ही याचिका दाखल करण्यात आली असून त्यात श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी १९६८ मध्ये मथुरा न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे.

त्यावेळी श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान व शाही इदगाह व्यवस्थापन समिती यांच्यात जमिनीचा करार झाला होता त्याला न्यायालयाने मंजुरी दिली होती. अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आता कृष्ण जन्मस्थानास भेट देण्याचे ठरवले असून या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी हे परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

कृष्णजन्मभूमी खटल्यात वादी म्हणून सहभाग घ्यायचा की नाही हे वृंदावनच्या बैठकीत ठरणार आहे. हिंदू मंदिरांजवळ असलेल्या मशिदींबाबत गिरी यांनी सांगितले की, मथुरेचे कृष्ण जन्मस्थान व वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर मुक्त करण्यात यावे. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मथुरेतील मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला असून कृष्ण जन्मस्थानाच्या ठिकाणी असलेली ईदगाह मशीद हटवण्यासाठीच्या याचिकेवर मथुरा न्यायालयात ३० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात शुक्रवारी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

त्यात १९६९ मध्ये मथुरा न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. १९६८ च्या निकालात मथुरा न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान व शाही ईदगाह व्यवस्थापन समिती यांच्यातील जमीन करारास मान्यता दिली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*