मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील प्रकार

मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. आपल्या पुढील शिक्षणाचा मार्ग खडतर होणार असल्याच्या भीतीने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

बीड : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. या निर्णयाबाबत मराठा समाजाकडून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाबाबत बाजू चांगल्या पध्दतीने मांडली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बीड तालुक्यातील केतूरा गावात यामुळे करुण घटना घडली आहे. अठरा वर्षांच्या विवेक राहाडे या तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विवेक याने नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल असावं, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.

आरक्षण स्थगित झाल्याच्या नैराश्येतून एका उच्चशिक्षित तरुणाने लातूरमध्ये गेल्या आठवड्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील कार्यालयापुढे ही घटना घडली होता. किशोर गिरीधर कदम (वय-30) असं तरुणाचं नाव आहे. सध्या किशोरवर लातूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे, मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणात मराठ्यांचा समावेश करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. मात्र असे केल्यास न्यायालयात असणाऱ्या आरक्षणाला धक्का बसू शकतो, अशी भूमिका घेत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह मराठा समाजातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी आर्थिक निकषावर आरक्षण नको, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*