महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली पोलीसांच्या अकार्यक्षमतेची कबुली

पालघरमध्ये साधूंच्या झुंडबळी प्रकरणातील पोलीसांची अकार्यक्षमता महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कबुल केली आहे. दोषी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची माहिती न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पालघरमध्ये साधूंच्या झुंडबळी प्रकरणातील पोलीसांची अकार्यक्षमता महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात कबुल केली आहे. दोषी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची माहिती न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.

पालघर झुंडबळी प्रकरणात पोलीसांना वाचविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करत होते. मात्र, जनतेचा संताप आणि न्यायालयाचा धाक यामुळे काही पोलीसांवर कारवाई करण्यात आली. आता महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यामध्ये दोषी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये झालेल्या साधू हत्या प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह १८ दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला पदच्युत करण्यात आलं असून दोघांना अनिवार्य सेवानिृत्ती देण्यात आलीय. इतर १५ पोलिसांना वेतन कपातीसोबतच दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.

या प्रकरणात २५२ व्यक्तींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलीय. ही चार्जशीट सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आली. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आलीय. आता या प्रकरणाची सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्ते शशांक शेखर झा यांनी पोलीस चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची सुनावणी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यावर महाराष्ट्र सरकारने दोषी पोलिसांवर कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

१६ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात दोन साधुंसहीत तीन जणांची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. या घटना घडली तेव्हा पोलिसही घटनास्थळावर उपस्थित होते. यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांकडून निष्काळजीपणा करणाऱ्या दोषी पोलिसांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती न्यायालयाने मागितली होती

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*