महाराष्ट्रातल्या लेकीबाळी रस्त्यावर पडल्याहेत का? उत्तर द्या, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्याना सवाल

लाज वाटली पाहिजे. रोज मोकाट हरामखोरांकडून महिलामुलींच्या अब्रूचे लचके तोडले जाताहेत. महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्याहेत का? उत्तर द्या, असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरुन भाजप नेते सरकारला धारेवर धरत आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लाज वाटली पाहिजे. रोज मोकाट हरामखोरांकडून महिलामुलींच्या अब्रूचे लचके तोडले जाताहेत. महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्याहेत का? उत्तर द्या, असा संतप्त सवाल भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरुन भाजप नेते सरकारला धारेवर धरत आहेत. सोमवारी मुंबईतील गोरेगाव येथे एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ज्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा मुलीच्या वडिलांचा मित्रच आहे. जो त्यांच्या घरी नेहमी येत-जात असे. याच व्यक्तीने मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य केलं आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

प्रियांका गांधी या हाथरसकडे जात असताना दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर त्यांच्यासोबत गैरवर्तवणूक करत त्यांचा कुर्ता ओढला होता. त्याबाबत चित्रा वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेसनंही कौतुक केलंय. गेल्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी चित्रा वाघ आपले ‘संस्कार’ विसरलेल्या नाहीत, असे काँग्रेसनं म्हटलंय.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*