सदोष किट प्रकरणी अमित देशमुख – राजेश टोपे यांची जुंपली

  • खोलवर माहिती न घेता आरोग्यमंत्र्यांचे वक्तव्य : अमित देशमुख

वृत्तसंस्था

मुंबई : ठाकरे – पवार राज्य सरकारने खरेदी केलेल्या कोरोना तपासणीच्या 12 लाख 50 हजार किट्स या सदोष आढळल्याचे वक्तव्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करताच वैद्य वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खरेदीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांचे मंत्री आमने-सामने आले आहेत

किट सदोष होत्या. मात्र या सर्व किट्स वैद्यकीय शिक्षण संचालयाने खरेदी केल्या असल्याचे म्हणत राजेश टोपेंनी हात झटकले होते. त्यावर अमित देशमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली राजेश टोपे यांनी दिली होती. यासंदर्भात बोलताना खोलवर माहिती न घेता राजेश टोपेंनी वक्तव्य केल्याचं म्हणत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालना दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. सदोष पीसीआर किट्स प्रकरणी एका समितीची स्थापना केली असून याचा अहवाल आल्यावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचेही ते म्हणाले होते.


या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केले होते. तसेच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.

काय म्हणाले होते आरोग्यमंत्री?

यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, “GCC Biotech Ltd कंपनीच्या माध्यमातून राज्यभरात वितरित झालेल्या किट्समध्ये मोठ्या प्रमाणात लो पॉझिटिव्हिटी रेट आढळला आहे. एनआयव्हीचा असा अहवाल आहे की GCC Biotech Ltd च्या किट्स सदोष आहेत. आता दोनच पर्याय उरतात. अशा किट्स पुरवणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. जिथे किट्सचं वाटप झालं आहे तिथले निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील. ही घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्यासाठी ज्या किट्स हाफकिनकडून खरेदी केल्या जातात, त्या खरेदीसंदर्भात एनआयव्हीच्या तज्ज्ञांची समिती नेमण्याची गरज आहे. टेस्टिंग हा महत्त्वाचा विषय आहे. त्याची सेन्सिटिव्हिटी जर 27 टक्क्यांपर्यंत खाली आली तर चुकीचे निकाल येतील. म्हणून याबाबत पूर्ण सतर्कता आणि दक्षता घेतली जाईल.”

अर्जुन खोतकर यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र

यासंदर्भात अर्जुन खोत यांनी राजेश टोपे यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “महाराष्ट्रातील विविध आरटीपीसीआर लॅबरेटरीमध्ये पाच ऑक्टोबरपासून कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचे बोलले जाते. परंतु वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. याचे एकमेव कारण म्हणजे चाचणी किट्स सदोष आहेत. आयएमसीआर तपासणीत कंपनीने पुरवलेले किट्स सदोष असल्याचे सिद्ध झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार मिळणार नाही आणि ते बाहेर फिरल्यास संसर्ग वाढेल. त्यामुळे याची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती.”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*