खिचडी सरकार असले की अशी फजिती होते, एमआयएम खासदार जलील यांचा सत्तारांसमोर शिवसेनेला टोला

शिवसेना आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएएम) यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळेच महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत एकत्र दौरा करतानाही एमआयएमचे खासदार यांनी शिवसेनेला खिचडी सरकारवरून चांगलाच टोला लगावला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सत्तार त्याला उत्तर देऊ शकले नाहीत.


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : शिवसेना आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळेच महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत एकत्र दौरा करतानाही एमआयएमचे खासदार यांनी शिवसेनेला खिचडी सरकारवरून चांगलाच टोला लगावला. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सत्तार यांनी त्याला उत्तर मात्र दिले नाही.

एमआयएम आणि शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून मानले जातात. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी केल्यापासून हा विरोध टोकाला जाऊन पोहोचला आहे. मात्र, कन्नड तालुक्यातील शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकत्र दौरा केला.

औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाला नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी सरकारकडे लावून धरली होती. यासाठी सत्तार यांनी कन्नड तालुक्यात दौरा केला. या वेळी एमआयएएमचे खासदार जलील त्यांच्यासोबत होते.

या दौऱ्यानंतर बोलताना जलील म्हणाले, कृषी सुधारणा विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला आहे. मात्र, राज्यात मात्र महाविकास आघाडीने हा कायदा लागू करायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. खिचडी सरकार असले की अशी फजिती होते. शिवसेनेने कृषी विधेयकासंदर्भात आपली भूमिका मोकळेपणाने मांडावी.

जलील यांच्या आरोपावर सत्तार यांनी काहीही उत्तर दिले नाही. मात्र, त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांनी सत्तार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. निष्ठा बाजुला सारून पक्षात आलेल्यांना पदे दिल्यावर असेच होते, असा आरोप शिवसैनिकांनी सत्तार यांच्यावर केला. वास्तविक जलील यांच्या आरोपांनंतर एखादा कट्टर शिवसैनिक असता तर पेटून उठला असता. त्याने कडक शब्दांत उत्तर दिले असते. परंतु, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी पक्षात आलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडून ही अपेक्षा करणेच चुकीचे आहे, अशीही टीका शिवसैनिकांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*