आव्हाडांच्या अडचणींत भर; अनंत करमुसे मारहाण प्रकरणी तीन पोलिसांना अटक

  • सहा महिन्यांनी कारवाई; अटकेनंतर पोलिसांना जामीनही मंजूर

वृत्तसंस्था 

ठाणे : कथित आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे.

करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीनंतर ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना एप्रिल महिन्यात करमुसे यांना मुंबईवरून भेटण्यासाठी निघालेल्या भाजपच्या काही नेत्यांना ठाण्याच्या सीमेवर रोखले होते. या सर्व घडामोडीनंतर वर्तकनगर पोलिसांनी एप्रिलमध्येच पाच आरोपींना अटक केली होती.

आता या प्रकरणात तीन पोलिसांना अटक केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. हे सर्व कर्मचारी पोलिस मुख्यालयातील असून ते बॉडीगार्ड आहेत. यातील दोन पोलीस मुंबईचे तर एक ठाण्यातील आहे. त्यांना जामीन मिळाला असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. करमुसे यांच्यासोबत लिफ्टमध्ये हे तीन पोलीस कर्मचारी होते. या पोलिसांनी करमुसे यांना बोलावून आणले होते व त्याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

मुख्य सूत्रधार कधी गजाआड होणार?: निरंजन डावखरे

आता तीन पोलिसांवर कारवाई झाली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गजाआड होणार का?, असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. या प्रकरणात सहा महिन्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याबद्दल डावखरे यांनी ठाणे पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मात्र अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा करमुसे यांच्याशी वैयक्तिक वाद नाही. त्यांनी करमुसे यांना कोणाच्या आदेशावरून घरातून आणले याचीही कसून चौकशी होण्याची गरज आहे, असेही डावखरे यांचे म्हणणे आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*