देशातील ५१ लाख झाले बरे, तरीही विषाणूचा धोका कायम, सेरो सर्वेक्षण अहवाल

चीनी व्हायरसच्या संसर्गातून बरे झालेल्यांच्या संख्येने भारतात 51 लाखाचा आकडा पार केला असून जगातली ही सर्वाधिक संख्या आहे. मात्र अद्यापही लक्षणीय लोकसंख्येला विषाणू संसर्गाचा अधिक धोका असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केलेल्या दुसऱ्या सिरो अहवालात आढळून आले आहे. याशिवाय आतापर्यंत 7 कोटी 30 लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या आठवड्यात 77.8 लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी दिली.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संसर्गातून बरे झालेल्यांच्या संख्येने भारतात 51 लाखाचा आकडा पार केला असून जगातली ही सर्वाधिक संख्या आहे. मात्र अद्यापही लक्षणीय लोकसंख्येला विषाणू संसर्गाचा अधिक धोका असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केलेल्या दुसऱ्या सिरो अहवालात आढळून आले आहे. याशिवाय आतापर्यंत 7 कोटी 30 लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या आठवड्यात 77.8 लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी दिली.

कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती, सज्जता आणि उपाययोजना यासंदर्भात ते प्रसार माध्यमांना माहिती देत होते. भारतात अद्यापही दहा लाख लोकसंख्येमागे आढळणारे रुग्ण (4453) आणि मृत्यू (70) ही जगातल्या कमी संख्येपैकी आहे. गेल्या सात दिवसात भारतात दहा लाख लोकसंख्येमागे 425 नव्या रुग्णांची नोंद झाली. आयसीएमआर आणि खाजगी क्षेत्राच्या प्रयत्नाने भारताने दहा लाख लोकसंख्येमागे 50 हजारांपेक्षा जास्त चाचण्या करण्याचा टप्पा गाठला आहे.

सध्याच्या दिवसात नव्या रुग्णापेक्षा, नव्याने बऱ्या झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे राष्ट्रीय आलेखाच्या विश्लेषणात आढळून आले आहे. 15 सप्टेंबर 2020 पासूनच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत घट तर बरे झालेल्यांच्या टक्केवारीत वाढ दिसून येत आहे. आजच्या तारखेला 15.4 टक्के सक्रीय रुग्ण आहेत तर 83.01 टक्के बरे झाले आहेत.

आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणात ऑगस्ट 2020 पर्यंत नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णाद्वारे 32 जणांना लागण झाल्याचे आढळले असल्याची माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली. शहरी भागातल्या झोपड्यांमधला धोका हा विना झोपड्या विभागाच्या दुप्पट तर ग्रामीण भागापेक्षा चौपट धोका असल्याचे आढळून आले आहे. लॉक डाऊन, प्रतिबंधित क्षेत्र, वर्तनात्मक परिवर्तन यामुळे संभाव्य प्रसाराला प्रभावी आळा बसल्याचेही त्यांनी सांगितले. येणारे सण, हिवाळा लक्षात घेता राज्यांनी कल्पक प्रतिबंध रणनीतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशाची अर्थव्यवस्था चालण्यासाठी मोठे योगदान असणाऱ्या कामगार वर्गाला संसर्गाचा मोठा धोका असल्याचे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही. के. पॉल यांनी सांगितले. यासाठी औद्योगिक आस्थापनांसाठी सुरक्षित कार्यस्थळ मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. कामगार वर्गाला संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत.

भारतातल्या सहा देशांतर्गत कंपन्या रेमडेसीवीरचे उत्पादन करत असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितली. केवळ एकच उत्पादक असताना याची किंमत साडे पाच हजार रुपये होती आता ती कमी होऊन 2800 रुपये झाल्याचे ते म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*