बिहारमध्ये बाहुबली पप्पू यादवांबरोबर प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात

वंचित बहुजन आघाडीची बिहार निवडणुकीत उडी


वृत्तसंस्था

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत बाहुबली नेते पप्पू यादव यांच्या बरोबर आघाडी करून प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरले आहेत. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएम पाठोपाठ अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीनेही बिहारची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी एमआयएमने केली होती. त्यापाठोपाठ आज वंचित बहुजन आघाडीनेही बिहार निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

“बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्समध्ये (पीडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आघाडीत अन्य पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आघाडीच्या माध्यमातून एनडीएच्या अमानवी सरकार सत्तेवरून हटवून मानवतावादी सरकार स्थापन करू,” असा विश्वास वंचित आघाडीने व्यक्त केला आहे.

“बिहार विधानसभा निवडणूक जन अधिकार पार्टीचे अध्यक्ष व प्रोग्रेसिव्ह डेमॉक्रटिक अलायन्सचे समन्वय राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांच्यासोबत लढणार आहोत. यशवंत सिन्हा व काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही एनडीएचे सरकार दूर करू,” असा दावा आंबेडकर यांनी केला आहे.

बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*