राज्यातील राजकारण मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख सध्या स्पष्टीकरणे देण्याच्या धांदलीत आहेत. मात्र, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. एकाच दिवशी राज्यातील तब्बल २७९ पोलीसांना चीनी व्हायरसचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत साडेपाच हजार पोलीस बाधित झाले असून आत्तापर्यंत ७० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील राजकारण मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून तापले आहे. गृह मंत्री अनिल देशमुख सध्या स्पष्टीकरणे देण्याच्या धांदलीत आहेत. मात्र, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. एकाच दिवशी राज्यातील तब्बल २७९ पोलीसांना चीनी व्हायरसचा विळखा बसला आहे. आत्तापर्यंत साडेपाच हजार पोलीस बाधित झाले असून आत्तापर्यंत ७० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
गृह मंत्री देशमुख सध्या राज्याचा दौरा करत आहेत. पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून झालेल्या वादासाठी स्पष्टीकरण देत आहेत. पण त्यापेक्षा आता सामाजिक कार्यकर्त्यांकडून देशमुख यांच्यावर टीका सुरू आहे. मोठ्या संख्येने पोलीस बाधित होत असताना गृह विभागाने काय केले, याची विचारणा आता सुरू झाली आहे.
पोलीसांना पुरेशी सुरक्षेची साधने दिली जात नसल्याचा आरोप होऊ लागला आहे. इतर शासकीय विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चाचणीची व्यवस्था केली, त्यांच्यासाठी रुग्णालयांमध्ये खास कक्ष उभारले. मात्र, गृहमंत्र्यांना या सगळ्यासाठी अद्याप वेळच मिळालेला नाही.
राज्यातील चीनी व्हायरसची जबाबदारी सर्व शासकीय यंत्रणांनी घेणे गरजेचे आहे. पण देशमुख कोणताही विरोध करत नसल्याने सगळ्या कामांना पोलीसांनाचा जुंपले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा कर्फ्यू लागू झाला आहे. त्यामुळे पोलीसांवर पुन्हा एकदा बंदोबस्ताचा ताण आला आहे. मात्र, या परिस्थितीतही क्वारंटाईन सेंटरची जबाबदारी, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना सुविधा पुरविणे यासारख्या अनेक कामांना पोलीसांनाच जुंपलेले आहे. त्यामुळे पोलीसांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.
राज्यात गेल्या चार महिन्यांत ५ हजार ४५४ पोलिसांना लागण झाली आहे. सध्या १०७८ पोलिसांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. त्यात ९५८ पोलीस कर्मचाऱ्यांचा तर १२० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७० पोलिसांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यात ६५ कर्मचारी व ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.